कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई केली आहे. आयोगानं ममता बॅनर्जी यांना 24 तास प्रचार करण्यास बंदी घातली आहे. अल्पसंख्याक मतांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठविली. भाजपाच्या नेत्यांनी ममता यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. ममतांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
काय म्हणाल्या होत्या ममता?
विद्यापीठांसाठी कन्याश्री शिष्यवृत्ती आहे. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी शिक्षाश्री आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती आहे. अल्पसंख्यक समुदायातील माझ्या बंधू आणि भगिनींसाठी, एक्यश्री आहे. मी 2 कोटी 35 लाख जणांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिला आहे. भाजपाकडून पैसे घेतलेल्या पक्षांना मतदान करू नका, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. मतांचे विभाजन होऊ देऊ नका, असे ममता बॅनर्जी सभेत म्हणाल्या होत्या.
काय म्हणाले निवडणूक आयोग?
ममता बॅनर्जी एक मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आचारसंहिता तसेच लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 123 (3) आणि 3 अ आणि आयपीसी 1860 च्या कलम 166, 189 आणि 505 चे उल्लंघन केले आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडेल आणि निवडणूक प्रक्रियेला खीळ बसू शकेल अशी अत्यंत भडक विधाने ममता बॅनर्जी यांनी केली आहेत, असे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
सोमवार रात्री 8 पासून ते मंगळवारी 8 वाजेपर्यंत प्रचार बंदी -
ममता बॅनर्जी यांचे उत्तर समाधानी नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने आज रात्री आठ वाजेपासून उद्या रात्री आठ वाजेपर्यंत त्यांच्या प्रचारावर बंदी घातली आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानाचे चार टप्पे पार पडले आहेत. पाचव्या टप्प्यात 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर सहाव्या टप्प्यासाठी 22 एप्रिल, सातव्या टप्प्यासाठी 26 एप्रिल आणि आठव्या टप्प्यासाठी 29 एप्रिल रोजी मतदान होईल. 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
हेही वाचा - उत्सव, टाळ्या-थाळ्या खूप झालं, आता देशाला लस द्या; राहुल गांधींचा हल्लाबोल