सुरत ( गुजरात ) - मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्याने शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस समोर आली आहे. एकनाथ शिंदे सोमवारी (दि. 20 जून) सायंकाळपासून नॉट रिचेबल झाले होते. त्यांच्यासोबत डझनभर आमदार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. सर्वजण सुरतच्या ले मॅरीड या हॉटेलमध्ये सर्व जण असल्याची माहिती मिळत ( Eknath Shinde In Surat ) आहे.
काल रात्रीच पोहोचले सुरतमध्ये : काल विधानपरिषदेची निवडणूक झाल्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार हे विमानाने सुरतला पोहोचले. येथील विमानतळाच्या जवळच असलेल्या ले मॅरीड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ते जाऊन थांबले. भाजपकडून या सर्वांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे.
मोठ्या पोलीस बंदोबस्त : हॉटेलमधील सर्व खोल्या बूक झालेल्या आहेत. हॉटेलमध्ये कोणीही जाऊ नये यासाठी हॉटेलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्या ठिकाणी कोणालाही जाऊ दिले नाही. या हॉटेलमधील नवव्या मजल्यावर शिंदे हे आमदारांसह थांबले असल्याचे समजले.
गुजरात भाजपचे नेते संपर्कात : महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे हे सुरतमध्ये पोहोचले आहेत. येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ते थांबले असून, त्यांच्यासोबत शिवसेनेचे ११ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री घेणार भेट ? : दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज दुपारी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेत ते काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, शिंदे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष पाटील हे शिंदे यांची याच हॉटेलमध्ये भेट घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Eknath Shinde : नाराज मंत्री एकनाथ शिंदे सुरतमध्ये.. गुजरात भाजप अध्यक्षांच्या संपर्कात