लखनऊ : उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी एका रुग्णालयाच्या आठ कर्मचाऱ्यांना अटक केली. सुभर्ती वैद्यकीय महाविद्यालयातील या कर्मचाऱ्यांवर रेमडेसिवीर इंजेक्शन बाहेर विकल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णासाठी आणलेले रेमडेसिवीर विकून, रुग्णाला चक्क सलाईन वॉटर दिले होते. यातच एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कर्मचाऱ्यांनी हे इंजेक्शन २५ हजार रुपयांना बाहेर विकले होते. याप्रकरणी दहा लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाविद्यालयाचे ट्रस्टी अतुल भटनागर आणि त्यांच्या मुलाचाही समावेश आहे.
दोन वॉर्डबॉयनी केला गुन्हा कबूल..
गाझियाबादच्या शोभित जैन याला रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती ढासळत असल्यामुळे डॉक्टरांनी रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी रेमडेसिवीरची व्हाईल उपलब्ध करुन दिली होती. मात्र, वॉर्डबॉयने त्याऐवजी सलाईन वॉटरचे इंजेक्शन रुग्णाला दिले. ज्यामुळे शोभितचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन वॉर्डबॉयनी आपला गुन्हा कबूल केला आहे.
हेही वाचा : जयपूर गोल्डन हॉस्पिटल दुर्घटना : मृतांचे नातेवाईक शोधतायत उत्तरं...