बंगळुरू : गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यानंतर कर्नाटकातील गायींसाठी चांगले दिवस आले आहेत. मात्र, दुसरीकडे राज्यातील प्राणीसंग्रहालयात असणाऱ्या मांसाहारी प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मैसूरमध्ये असणाऱ्या प्राणीसंग्रहालयात सिंह, वाघ, बिबट्या, मगर, तरस, आफ्रिकन चित्ता असे मांसाहारी प्राणी आहेत. सुरुवातीपासूनच त्यांना गोवंश प्राण्यांचे मांस दिले जात होते. आता राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यामुळे, या प्राण्यांना कोंबड्यांचे मांस देण्यात येत आहे. मात्र, गोवंशातील प्राण्यांच्या मांसाची सवय असणाऱ्या या प्राण्यांना आपल्या डाएटमधील हा बदल काही रुचत नाहीये.
आरोग्यावर होतोय परिणाम..
या प्राण्यांचा दररोजचा खुराक हा सुमारे ३०० ते ३५० किलो बीफ असा होता. मात्र, चिकनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, हीच मात्रा ५०० किलो करावी लागत आहे. या प्राण्यांना कोंबडीसारखा लहान प्राणी खाणे रुचत नाही. तसेच, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हे योग्य नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.
प्राण्यांचे सुरू आहे निरीक्षण..
त्यामुळे, सध्या प्राणीसंग्रहालयातील डॉक्टर या प्राण्यांचे सतत निरीक्षण करत आहेत. आपल्या अन्नात झालेल्या बदलाला या प्राण्यांची शरीरे स्वीकारतात का यावर हे डॉक्टर लक्ष ठेऊन आहेत. प्राणीसंग्रहालयाचे अधिकारी अजित कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली.
हेही वाचा : अॅप्स बंदीवर चीनची पुन्हा प्रतिक्रिया...