नवी दिल्ली : अंदमान आणि निकोबार बेटांवर सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. निकोबार बेटांवरील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.0 इतकी मोजली गेली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी नुसार, सोमवारी सकाळी 5.07 वाजता निकोबार बेटांवर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 5.0 तीव्रता होती. भूकंपानंतर लोकांनी घाबरून घराबाहेर पळ काढला. भूकंपामुळे किती प्रमाणात नुकसान झाले आहे, याची अद्याप माहिती मिळाली नाही.
जम्मू - काश्मीर मध्येही आला भूकंप : या आधी शनिवारी उत्तराखंडच्या उत्तरकाशी आणि रविवारी जम्मू - काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात भूकंप झाला होता. रविवारी जम्मू - काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात ३.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बांदीपोरा जिल्ह्यात सकाळी ६.५७ च्या सुमारास ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खाली 34.42 अंश उत्तर अक्षांश आणि 74.88 अंश पूर्व रेखांशावर होता. येथेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.
उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के : दुसरीकडे, शनिवारी रात्री उशिरा उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे 2.5 तीव्रतेचे भूकंपाचे सलग तीन धक्के जाणवले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा 12.45 च्या सुमारास पहिला भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र उत्तरकाशी जिल्ह्यातील भटवारी भागातील सिरोर जंगलात होते. त्यांनी सांगितले की, त्यानंतर आणखी दोन भूकंपाचे धक्के जाणवले, जे खूप सौम्य होते. ते म्हणाले की, स्वयंपाकघरातील भांडी पडल्याने तसेच खिडकीच्या काचेच्या आणि दारांच्या खडखडाटामुळे अनेक रहिवासी जागे झाले आणि त्यांना घाबरून घराबाहेर पळावे लागले. अधिकाऱ्याने सांगितले की, लोकांनी भीतीमुळे संपूर्ण रात्र घराबाहेर काढली. तुर्कस्थानमध्ये भूकंपात 45 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर कुठेही भूकंप झाला तरी नागरिकांना चिंता वाटू लागते.