पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेस पक्ष आणि आम आदमी पक्षाचा कॉंग्रेसला फटका बसला, असा सर्वसामान्य समज आहे. याचे विश्लेषण करण्यासाठी आम्ही भाजपने जिंकलेल्या प्रत्येक जागेची गोळाबेरीज केली. त्यात असे आढळून आले की, तृणमूल आणि आपचा कॉंग्रेसला ५ जागांवर फटका बसला. हे दोन पक्ष नसते तर कॉंग्रेसच्या १५ जागा निवडून आल्या असत्या. तसेच भाजपच्या जागा ५ ने कमी होऊन १५ वर आल्या असत्या. यासह काही धक्कादायक बाबी या विश्लेषणात पुढे आल्या आहेत. जाणून घेऊयात, भाजपला मिळालेल्या प्रत्येक जागेचे विश्लेषण..
- कुठे, कुणाची किती ताकद..
पेरनेम- या मतदारसंघातून भाजपचे प्रविण आर्लेकर निवडून आले. त्यांना एकूण १३,०६३ मते पडली. तर दुसऱ्या क्रमांकावर राजन कोरगावकर राहिले. त्यांना एकूण ९६४५ मते पडली. तर कॉंग्रेसच्या जितेंद्र गोवनकर यांना १८२७ मते पडली. या मतदारसंघात भाजप स्वबळावर निवडून आला.
थिविम- या मतदारसंघातून भाजपचे निळकंठ हलर्नेकर निवडून आले. त्यांना एकूण ९४१४ मते पडली. येथून कॉंग्रेसचे उमेदवार अमन लोटलीकर यांना केवळ १२६२ मते पडली. या मतदारसंघातून तृणमुलच्या कविता कोंडुलकर यांना 7363 मते पडली तर, आपच्या उदाई सालकर यांना 421 मते पडली. येथेही आप आणि टीएमसीचा कॉंग्रेसला फटका बसला नाही.
पोरवोरिम- या मतदारसंघातून भाजपचे रोहन खाऊंटे ११७१४ मते पडली. येथूल कॉंग्रेस आणि तृणमूलच्या उमेदवारांना सुमारे ३ हजारांच्या घरात मते पडली. येथे तृणमूलचा कॉंग्रेसला फटका बसला नाही.
पणजी- येथून भाजपचे अटान्सिओ मॉन्सेरा यांना ६७८७ मते पडली. विपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांना ६०७१ मते पडली. तर कॉंग्रेसच्या एल्विस गोम्स यांना ३१७५ मते पडली. याचा अर्थ असा की, कॉंग्रेसने उत्पल यांना पाठिंबा दिला असता तर ते निवडून आले असते.
मायेम- भाजपच्या प्रेमेंद्र सेट यांना ७८७४ मते पडली. येथून कॉंग्रेसचा उमेदवार नव्हता. पण रिहोलुशनरी गोवन पार्टी, आम आदमी पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांचे उमेदवार होते. त्यांना सुमारे दोन ते चार हजारांच्या घरात मते मिळाली. या मतविभाजनाचा फायदा सेट यांना झाला.
सांकळी- येथून प्रमोद सावंत यांना एकूण १२२५० मते मिळाली. कॉंग्रेसच्या धर्मेश संगलानी यांनी ११,५८४ मते पडली. आपच्या मनोजकुमार घाडी यांना १०९ मते पडली. कॉंग्रेस आणि आपची मते गोळा केली तरी सावंत यांचा पराभव झाला नसता.
पोरियम- भाजपच्या देवयानी राणे यांना १७,८१६ मते पडली. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांना अत्यल्प मते पडली. त्या स्वःबळावर निवडून आल्या आहेत.
वळपोई- भाजपच्या विश्वजित राणे यांना १२२६२ मते पडली. त्यांच्या मतांच्या जवळपासही कुणी उमेदवार नव्हता. तेही स्वःबळावर निवडून आले आहेत.
प्रियोल- भाजपचे गोविंद गावडे यांना ११,०१९ मते पडली. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे उमेदवार पांडुरंग ढवळीकर यांना १०,८०६ मते पडली तर कॉंग्रेसचे दिनेश झलानी यांनी ३०३ मते पडली. येथे कॉंग्रेसच्या उमेदवाराला अत्यंत कमी मते पडली आहे. येथून टीएमसी किंवा आपचा उमेदवार नव्हता.
पोंडा- भाजपच्या रवी नाईक यांना एकूण ७,५१४ मते पडली. एमजीपीचे केतन भाटीकर यांना ७,४३७ मते पडली. तर कॉंग्रेसचे राजेश वेरेनकर यांना ६,८३९ मते पडली. येथे टीएमसी किंवा आपचा उमेदवार नव्हता.
सिरोडा- भाजपचे सुभाष सिरोडकर यांना ८३०७ मते पडली. कॉंग्रेसच्या तुकाराम बोरकर यांना १९५३ मते पडली. तर आपच्या महादेव नाईक यांना ६१३३ मते पडली. या दोघांच्या मतांची बेरीज केल्यानंतरही सिरोडकर यांचा पराभव झाला नसता.
वास्को द गामा- भाजपचे कृष्णा सालकर यांना १३,११८ मते पडली. कॉंग्रेसच्या जोश एलमैडा यांना ९४६१ मते पडली. तर टीएमसीच्या सैफुला खान यांना ८६० तर आपच्या सुनिल लोरेन यांना ७८४ मते पडली. या तिघांच्या मतांची बेरीज केली तरी भाजपचा उमेदवार पडला नसता.
सॅनव्होरडेम- भाजपच्या गणेश गांवकर यांना ११,८७७ मते पडली. कॉंग्रेसचे खेमलो सावंत यांना ३८३ मते पडली. गांवकर स्वबळावर निवडून आले. येथे आप किंवा टीएमसीचा उमेदवार नव्हता.
सांग्वेम- भाजपच्या सुभाष देसाई यांना ८७२४ मते पडली. कॉंग्रेसच्या प्रसाद गांवकर यांना ४६४४ मते पडली. टीएमसीच्या राखी नाईक यांनी १८५ तर आपच्या अभिजित देसाई यांना ८९४ मते पडली. येथे भाजपचा उमेदवार स्व-बळावर निवडून आला आहे.
कॅनाकोना- भाजपचे रमेश तावडकर यांना एकूण ९०६३ मते पडली. कॉंग्रेसचे जर्नादन भंडारी यांना ५३५१ मते पडली. टीएमसीचे महादेव देसाई यांना १०६६ तर अनुप खुडतरकर यांना ८३५ मते पडली. येथेही मतविभाजन झाले असले तरी तिन्ही पक्षांच्या मतांची बेरीज केली तरी भाजपचा उमेदवार पराजीत झाला नसता.
- 'या' पाच जागांवर टीएमसी आणि आपमुळे काँग्रेसला बसला फटका
म्हापसा- या मतदारसंघात भाजपच्या जोशूआ डिसुजा यांना १०,१९५ मते पडली. तर कॉंग्रेसच्या सुधिर कंडोलकर यांना ८५४८ मते पडली. तारक आलेरकर या तृणमूलच्या उमेदवाराला १३६६ मते पडली तर आपचे राहुल म्हामबरे यांना १५११ मते पडली. येथील मतविभाजनाचा कॉंग्रेसला फटका बसला आहे.
नवेमिल- भाजपच्या उल्हास टुनकर यांना ५१६८ मते पडली. कॉंग्रेसचे अव्हरटानो यांना ३८०६ मते पडली. टीएमसीचे व्हलंका अलेमाओ यांना ४७३८ मते पडली. तर आपचे प्रतिमा काऊंटिन्हो यांना २३२७ मते पडली. या ठिकाणी मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला आहे.
कार्चोरेम- भाजपचे निलेश कबरल यांना एकूण ९९७३ मते पडली. कॉंग्रेसच्या अमित पाटकर यांना ९३०१ मते पडली तर आपच्या गॅब्रिएल फर्निंडिस यांना ८३० मते पडली. येथे मतविभाजनाचा भाजपला फायदा झाला.
डाबोलिम- भाजपचे मौविन गोडिन्हो यांना ७५९४ मते पडली. कॉंग्रेसचे विरिअटो फर्निंडिस यांना ६०२४ मते पडली. आपचे प्रेमानंद नानोसकर यांना २५३३ मते पडली. तर टीएमसीचे महेश भंडारी यांना १५९ मते पडली. या ठिकाणी टीएमसी आणि आपचा फटका कॉंग्रेसला बसला आहे.
तलाईगाव- येथून भाजपच्या जेनिफर मॉन्सेरा यांना १०१६७ मते पडली. कॉंग्रेसच्या टोनी रोड्रिग्ज यांना ८१२६ मते पडली. येथून आपचे सेसिली रोड्रिग्ज यांना २६०७ मते पडली. येथे आपचा उमेदवार नसता तर कॉंग्रेसची जागा निवडून आली असती.
- उमेदवार देण्यात काँग्रेसची चूक
गोवा विधानसभा निवडणुकीत काही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी पाहिल्यास अत्यल्प मतं पडली आहेत. काही उमेदवारांनी ५०० पेक्षाही कमी मतं मिळवली. प्रियोल मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला अवघी ३०३ मतं पडली. त्यामुळे अशा जागांवर उमेदवार देण्यात काँग्रेसची चूक झाली असेच म्हणावे लागेल.