नवी दिल्ली : देशातील कोरोना स्थितीसंदर्भातील परिस्थिती आणि उपाययोजनांसंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हि के पॉल यांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात गंभीर इशारा दिला आहे. जगातील अनेक ठिकाणी कोरोनाची परिस्थिती वाईटातून अत्यंत वाईटाकडे गेल्याचे बघायला मिळाले आहे. संपूर्ण जगच तिसऱ्या लाटेच्या दिशेने जात आहे. डब्ल्युएचओने याचा इशारा दिला असून सर्वांनीच याचे गांभीर्य ओळखले पाहिजे. हा धोक्याचा रेड अलर्ट आहे असे पॉल म्हणाले.
यावेळी बोलताना कोरोना लसीच्या पहिल्या डोसमुळे मृत्यूदर 82 टक्क्यांनी कमी करणे शक्य होते. तर दुसऱ्या डोसमुळे याची परिणामकारकता 95 टक्क्यांपर्यंत वाढत असल्याचे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिसून आले आहे असेही पॉल यांनी सांगितले. त्यामुळे लसीकरण करणे हेच कोरोनाविरोधातील लढ्यात महत्वाचे असल्याचे त्यांनी यातून अधोरेखित केले आहे.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पॉल यांनी दिलेला इशारा महत्वाचा असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी उद्योग क्षेत्राचे नियोजन करा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना