रांची - राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. चारा घोटाळा प्रकरणात ते तुरुंगात शिक्षा भोगत असून त्यांच्यावर रांची येथील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आणखी चिंताजनक होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यांची किडनी फक्त २५ टक्के कार्यरत असल्याचे रुग्णालयातील डॉक्टर उमेश प्रसाद यांनी म्हटले आहे.
डायलेसिसची गरज पडण्याची शक्यता
डॉ. उमेश प्रसाद यांनी सांगितले की, लालू प्रसाद यादव यांच्या नुकत्यात आलेल्या अहवालानुसार त्यांची किडनी फक्त २५ टक्के कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत त्यांना डायलेसिसची गरज पडू शकते. लालू यांचा अहवाल तज्ज्ञ डॉक्टरांकडे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू
किडनीवरील पुढील उपचारासाठी त्यांनी दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचीही गरज पडू शकते. कारण, नेफ्रोलॉजी म्हणजे किडनीसंबंधी आजावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर आहेत. शरिरात साखरेचे प्रमाणात जास्त असल्याने त्यांच्या किडनीवर परिणाम झाला आहे. त्यांना इन्सुलिनचे इंन्जेक्शन देण्यात येत असले तरी त्यांची किडनी योग्य पद्धतीने काम करत नाही. लालू प्रसाद यादव यांना होटवार तुरुंगात हलविण्यात येणार असल्याचे मागील काही दिवसांपासून बोलले जात होते. मात्र, त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असल्याने त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येत आहे.