चेन्नई (तामिळनाडू): तामिळनाडूतील एका डॉक्टरने युट्युबवर व्हिडीओ टाकून खळबळ उडवून दिली आहे. आता याच व्हिडीओवरून तामिळनाडू बोर्ड ऑफ मेडिसिनने या डॉक्टरकडे स्पष्टीकरण मागितले आहे. उत्तर दाखल करण्यासाठी त्यांना १० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याने योग्य उत्तर न दिल्यास या डॉक्टरवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तामिळनाडू बोर्ड ऑफ मेडिसिनने दिली आहे.
डॉक्टर आहे भाजप नेत्याची मुलगी: युट्युबवर व्हिडीओ टाकून खळबळ उडवून देणाऱ्या डॉक्टरचे नाव शर्मिका शरण असे आहे. ती तामिळनाडूच्या भाजप नेत्या डेझी शरण यांची मुलगी आहे. डेझी या तामिळनाडू भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या नेत्या आहेत. शर्मिका शरण यूट्यूबवर विविध सल्ले देत असते. मात्र यावेळी तिच्या व्हिडीओवरून तक्रार झाल्याने आता हे प्रकरण पुढे अजूनच वाढणार असल्याची चिन्हे आहेत.
तीन महिन्यात दिसून येणार परिणाम: चुकीचा वैद्यकीय सल्ला दिल्याप्रकरणी, भारतीय औषध आणि होमिओपॅथी विभागाने डॉ. शर्मिका यांच्याकडून लेखी उत्तर मागितले आहे. त्यांना १० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यावेळी, त्यांचा सल्ला वादात सापडला आहे, ज्यामध्ये त्या दावा करत आहे की, पामचे फळ खाल्ल्याने महिलांच्या स्तनाचा आकार वाढतो. शर्मिकाच्या मते, तीन महिन्यांत त्याचा परिणाम दिसून येईल. परंतु त्यांचा हा सल्ला कोणत्याही वैज्ञानिक विश्लेषणाचा परिणाम आहे का?, यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही.
यापूर्वीही झाली होती तक्रार: शर्मिकाकडून उत्तर मागण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांच्या सूचना वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. तसेच शर्मिकाने दावा केला होता की, जर तुम्ही एक कप 'कुलोबजामुन' खाल्ले तर तुमचे वजन तीन किलोने वाढेल. शर्मिकाच्या अशा सल्ल्यांमुळे तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या अवैज्ञानिक सल्ल्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. आता तामिळनाडू सिद्ध मेडिकल कौन्सिलच्या रजिस्ट्रारने त्यांना नोटीस बजावली आहे. 6 जानेवारी रोजी नोटीस बजावली होती. त्या समितीसमोरही हजर झाल्या. त्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिले.
दोषी आढळल्यास होणार कारवाई: शर्मिकाच्या वकिलाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, तिला १० फेब्रुवारीपर्यंत वेळ देण्यात आला आहे. ती लेखी उत्तर दाखल करेल. शर्मिकाच्या स्पष्टीकरणाचा विचार केला जाईल आणि दोषी आढळल्यास तिच्यावर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा: स्तन सुडौल करण्यासाठी हे व्यायाम ठरू शकतात फायदेशीर, सुरुवात कराल तर दिसेल फरक