चेन्नई : पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी द्रमुकने (डीएमके) आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन हे कोलाथूर मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. तर, त्यांचे पुत्र उदयानिधी हे चेन्नईतील चेपौक-त्रिप्लिकेन या मतदारसंघातून आपले नशीब आजमावतील. अभिनेता असलेल्या उदयानिधीची ही पहिलीच निवडणूक असणार आहे.
माजी मंत्र्यांना पुन्हा तिकीट..
स्टॅलिन यांनी आज आपल्या १७३ उमेदवारांची यादी जाहीर केली. यांमध्ये बऱ्याच विद्यमान आमदारांचाही समावेश आहे. दुराई मुरुगन, के. एन. नेहरू, के. पोंमुडी आणि एमआरके पनीरसेल्वम या सर्व माजी मंत्र्यांनाही यावेळी तिकीट मिळाले आहे.
शुक्रवारपासून उमेदवारीसाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. आपण १५ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करुन, प्रचाराचा पुढचा टप्पा सुरू करणार असल्याचे स्टॅलिन यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.
डीएमकेची महाआघाडी..
२०११ पासून सत्तेबाहेर असणाऱ्या डीएमकेपुढे यावेळी एआयएडीएमकेला हरवून पुन्हा सत्तेत येण्याचे आव्हान असणार आहे. यासाठी काँग्रेस, डावे, एमडीएमके, व्हीसीके आणि इतर काही लहान पक्षांसोबत डीएमकेने युती केली आहे. एकूण २३४ मतदारसंघांपैकी ६१ जागा डीएमकेने या इतर पक्षांना दिल्या आहेत.
हेही वाचा : जेव्हा नेता शब्द पाळतो! राहुल गांधींनी चिमुकल्याला पाठवले 'स्पोर्ट्स शूज'