बीड - जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डचा आढावा शनिवारी घेतला. रुग्णालयात दाखल असलेल्या कोरणा पॉझिटिव्ह रुग्णांशी संवाद साधत, चांगले उपचार मिळतात का? याबाबत विचारपूसदेखील केली. यावेळेस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गिते यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजघडीला बीड जिल्ह्यात कोरोनाचे सक्रिय रूग्ण तीन हजाराच्या घरात आहेत. अशा परिस्थितीत शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची जगताप यांनी कोविड वॉर्डमध्ये जाऊन विचारपूस केली. याशिवाय रुग्णांना वेळेवर जेवण, नाष्टा तसेच गरम पाणी मिळते का, याचीदेखील तपासणी यावेळी जगताप यांनी केली. याप्रसंगी आरोग्य विभागातील डॉक्टर परिचारिका यांना काही अडचणी आहेत का याबाबतही सविस्तर चर्चा झाली.
कर्मचाऱ्यांनी मांडली कैफियत -
बीड जिल्हा रुग्णालयात साडेतीनशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था करण्यात आलेले आहे. याशिवाय बीड शहरात काही कोविड सेंटरदेखील उभारलेले आहेत. ज्या रुग्णांना अधिक त्रास आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये दाखल केले जाते. यादरम्यान नातेवाईक रुग्णालयाच्या आवारात अनेकवेळा गर्दी करतात. एवढेच नाही तर काही रुग्णांचे नातेवाईक कोविड वॉर्डच्या गेटपर्यंत येतात. यासाठी विशेष बंदोबस्त द्यावा, अशी मागणीही यावेळी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी केली. याशिवाय पीपीई किटची व्यवस्था करावी, असे कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना म्हटले आहे.