बेंगळुरू : बेंगळुरू शहरातील स्टार्ट-अप कंपनी मायनस झिरोने zPod चे अनावरण केले आहे. हे भारतातील पहिले स्वयंचलित वाहन असल्याचे म्हटले जात आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या वाहनात संपूर्ण सेल्फ ड्रायव्हिंग तंत्रज्ञान आहे. zPod हे चार आसनी इलेक्ट्रिक वाहन आहे, ज्याच्या सीट्स समोरासमोर आहेत. या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे याची रचना पारंपारिक कारप्रमाणे नाही. यात स्टीयरिंग व्हील नाही. तसेच या वाहनाला पारंपारिक कारप्रमाणे कोणतेही कंट्रोल्स नाहीत.
वाहनाचे सर्व ड्रायव्हिंग AI द्वारे केले जाते : या वाहनाचे सर्व ड्रायव्हिंग AI द्वारे केले जाते. ते निर्णय घेण्यासाठी कॅमेऱ्यांद्वारे कॅप्चर केलेल्या रियल टाइम चित्रांची मदत घेते. कंपनीनुसार, कॅमेरा सूटचा वापर खर्च कमी करण्यास मदत करेल. zPod हे एक स्वयंचलित वाहन आहे जे कोणत्याही भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थितीत त्याचा कॅमेरा सूट वापरून गाडी चालवू शकते. हे वाहन स्वयंचलित पातळी 5 गाठू शकते, ज्यात AI तंत्रज्ञानासह वाहन चालवताना कोणताही मानवी हस्तक्षेप होत नाही.
सध्या कॅम्पसमधील मोबिलिटीपर्यंत मर्यादित असेल : कंपनीचे म्हणणे आहे की, सध्यातरी zPod आणि त्याच्या AI तंत्रज्ञानाचा वापर सार्वजनिक रस्त्यांपासून दूर कॅम्पसमधील मोबिलिटीपर्यंत मर्यादित असेल. हे वाहन सध्या केवळ शैक्षणिक परिसर, निवासी क्षेत्रे, टेक पार्क इत्यादी ठिकाणी वापरले जाऊ शकते. मायनस झिरोचे सीईओ गुरसिमरन कालरा म्हणाले की, zPod चा उद्देश वाहतूक कोंडी, रस्ते अपघात व त्याच्याशी संबंधित जखमा आणि मृत्यू कमी करणे हा आहे.
ऑटोमोटिव्ह उद्योगात या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास नवीन क्रांती होईल. गाडी चालवण्याची चिंता न करता सुरक्षिततेच्या भावनेने यात प्रवास करता येतो. नजीकच्या भविष्यात सार्वजनिक रस्त्यांवर त्याची चाचणी घेतली जाणार असून वाहनांच्या रचनेसह आणखी विकास केला जाणार आहे. येत्या दोन वर्षांत जागतिक बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून त्याची रचना करण्यात आली आहे. - गुरसिमरन कालरा, सीईओ, मायनस झिरो
हेही वाचा :