नई दिल्ली - दिल्लीमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात प्रदषूण आहे. असे असताना देखील शनिवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. त्यामुळे वायू प्रदूषणात आणखी वाढ झाली. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने फटाके न फोडण्याचे आदेश दिले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून दिल्लीमध्ये नागरिकांनी फटाके फोडले.
या फटाक्यांच्या प्रदूषणामुळे रविवारी हवेच्या गुणवत्तेत प्रचंड घसरण झाली. एअर क्वालिटी इंडेक्स हा 500च्या जवळपास पोहचला होता. ही वायू प्रदूषणाची सर्वात धोकादायक स्थिती मानण्यात येते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीतील आनंद विहार परिसरात एअर क्वॉलिटी इंडेक्स 492 वर पोहचला होता. तर मथुरा रोड परिसरात 473, अशोक विहार परिसरात 492 वर एअर क्वॉलिटी इंडेक्स पोहचला. आज दिल्लीत पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे प्रदूषणाची पातळी कमी होऊन, हवेची गुणवत्ता सुधारू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.