नवी दिल्ली - दिल्ली सरकारच्या माहिती आणि सुचना विभागाचे उपसंचालक नलिन चौहान बेपत्ता झाले आहेत. शहरातील सिव्हिल लाईन भागात ते घरातून निघून गेले आहेत. मागील गुरुवारपासून ते बेपत्ता आहेत. घरातून जाताने त्यांनी मोबाईलही बरोबर नेला नाही. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ते विलगीकरणात राहत होते.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
नलिन चौहान घराबाहेर फिरण्यास गेले असता पुन्हा माघारी आले नाहीत. पोलिसांनी कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तक्रार दाखल केली असून शोध सुरू केला आहे. मागील गुरुवारी सुमारे ११ वाजता नलिन घरातून बेपत्ता झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोरोनाची झाली होती लागण
कुटुंबीयांनीही त्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागला नाही. मागील काही दिवसांपासून त्यांना कोरोनाची लागण झाल्याने उपचार सुरू होते. तसेच ते विलगीकरणात राहत होते. ते मानसिक तणावात असल्याची माहितीही मिळत आहे. घरातून बाहेर जाण्याआधी त्यांनी एक चिठ्ठी लिहल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
सुरक्षा रक्षकाबरोबर झालं शेवटचं बोलणे
घरातून बाहेर पडल्यानंतर नलिन यांनी इमारतीच्या सुरक्षारक्षकाला थोड्याच वेळात माघारी येणार असल्याचे सांगितले. तेथून ते राजपूररोडवरून तीस हजारी न्यायालयाकडे गेले. मात्र, माघारी आले नाही. नलिन मानसिक तणावात असल्याचे तसेच त्यांनी घरातून जाण्याआधी चिठ्ठी लिहल्याचे कुटुंबीयांनी फेटाळले आहे.