नवी दिल्ली - मनीष सिसोदिया यांना विशेष न्यायाधीश एम के नागपाल यांच्या न्यायालयात हजर केले होते. सीबीआयने त्यांची ५ दिवसांची कोठडी मागितली होती. दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये बराचवेळ युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची म्हणजे ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. सिसोदिया यांच्यावतीने तीन वकिलांनी बाजू मांडली.
रविवारी केली होती अटक - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी 26 फेब्रुवारीला अटक केली होती. सुमारे आठ तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर सीबीआयने त्यांना अटक केली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वीच त्यांच्या अटकेची भीती व्यक्त केली होती. तसेच या अटकेनंतर राजकीय वातावरण तापले आहे.
काय आहे विषय - नोव्हेंबर 2022 मध्ये दिल्ली सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल आणि मद्य माफियांवर अंकुश बसेल, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या धोरणाअंतर्गत सर्व सरकारी आणि खासगी दारूची दुकाने बंद करून नवीन निविदा जारी केल्या होत्या. नवीन धोरणानंतर सर्व दुकाने खासगी व्यवसायिकांच्या ताब्यात गेली. यावर दिल्लीच्या उपराज्यपालांनी आक्षेप घेतला होता. हे धोरण राबवताना गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप केला होता.
अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, देव तुमच्या पाठीशी आहे. लाखो नागरिकांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. देशासाठी, समाजासाठी तुरुंगात गेल्यावर तुरुंगात जाणे हा दुर्गुण नसून गौरव आहे. तुम्ही लवकरच तुरुंगातून परत येताल, अशी मी प्रार्थना करतो. आम्ही सर्व तुमची वाट पाहत आहोत. तुमच्या संपूर्ण कुटूंबाची काळजी मी घेईल, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.