नवी दिल्ली : ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर दुसऱ्या एका कुस्तीपटूची हत्या केल्याचा आरोप आहे. यानंतर तो फरार झाला होता. १८ दिवसांपासून फरार असलेला सुशील कुमार पंजाबमध्ये लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापेमारी करत, दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकाने त्याला अटक केली.
काय आहे प्रकरण..
दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर ४ मे रोजी सुशील कुमार आणि त्याच्या काही सहकाऱ्यांचा कुस्तीपटू सागर राणा याच्यासोबत वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये दोघे जखमी देखील झाले होते. त्यामध्ये सागरला जास्त मार लागल्यामुळे त्याला रुग्णालायात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, हा वाद मॉडेल टाऊन परिसरातील एका फ्लॅटवरून झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, सुशील कुमारने वेगळी भूमिका मांडली आहे. पोलिसांच्या हाती घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. याच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत होते.
एक लाखांचे होते बक्षीस..
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारवर एक लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. 'सुशील कुमार आणि त्याचा साथीदार यांचा शोध आमची पथके घेत आहेत. दोघांच्या विरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. ते फरार आहेत. त्यामुळे दोघांच्या अटकेसाठी बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला १ लाखांचे रोख बक्षिस दिल्ली पोलिसांकडून देण्यात येईल. तर अजय कुमार यांची माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षिस देण्यात येणार आहे.' असे दिल्ली पोलीस डीसीपी उषा रंगनाणी यांनी सांगितले होते. सुशील कुमारने या विरोधात दिल्ली न्यायालयात जामीनसाठी याचिका दाखल केली होती. परंतु, दिल्ली न्यायालयाने सुशील कुमारची याचिका फेटाळली होती.
हेही वाचा : कृषी कायदे विरोध : संयुक्त किसान मोर्चातर्फे बुधवारी 'ब्लॅक डे' आंदोलन