नवी दिल्ली - दिल्ली अनलॉक-8 नुसार सोमवार (26 जुलै) पासून अनेक सेवांना सूट देण्यात आली आहे. सिनेमा/थिएटर आणि मल्टीप्लेक्स 50 टक्के क्षमतेने सुरु केले जातील तर मेट्रो रेल्वे व सार्वजनिक बस सेवा 100 टक्के क्षमतेने सुरू केली आहे. दिल्ली डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (DDMA) द्वारे जारी आदेशानुसार सर्व ठिकाणी कोरोना प्रोटोकॉलचे पालन अनिवार्य असेल.
दिल्ली डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी द्वारे जारी आदेशानुसार, सोमवारपासून दिल्ली मेट्रो 100 टक्के सीटिंग क्षमतेवर सुरू राहील. आतापर्यंत 50 टक्के क्षमतेने मेट्रो धावत होती. मेट्रोसोबतच आधी 50 टक्के क्षमतेने धावणारी डीटीसी आणि क्लस्टर बस सेवाही 100 टक्के क्षमतेने सुरू होईल.
नव्या आदेशात स्पा मालकांना दिलासा देण्यात आला आहे. आजपासून दिल्लीतील सर्व स्पा खोलण्यात आले आहेत. त्यांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. याची जबाबदारी स्पा संचालकांची असणार आहे.
अनलॉक-8 नुसार आता लग्न संमारभासाठी 100 लोकांची मर्यादा निश्चित केली आहे. यापूर्वी ही मर्यादा 50 लोकांची होती. त्याचबरोबर आता अंत्यसंस्कारासाठीही आता 20 ऐवजी 100 लोक उपस्थित राहू शकतात. ऑडिटोरियम आणि असेंबलीही 50 टक्के क्षमतेने सुरू राहील. या सर्व ठिकाणी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे जबाबदारी संचालकांची असेल.