नवी दिल्ली - कोरोना संकटाच्या काळात नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याच्या अनेक युक्त्यांचा वापर भामट्यांनी सुरू केला आहे. याला दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची मुलगी बळी ठरली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हीची ओएलएक्स अॅपवर फसवणूक झाली आहे.
हर्षिता केजरीवाल हीला काही वस्तू विकायच्या होत्या. यासाठी तीने ओएलएक्स अॅपवर जाहिरात टाकली. त्यानंतर तीला एका व्यक्तीचा फोन आला. आपण त्या वस्तू खरेदी करू आणि ऑनलाईल पेमेंट करू, असे त्या व्यक्तीने सांगितले. तिच्याकडून बँक खात्याची माहिती घेतली. त्यासाठी एक कोड स्कॅन करायला सांगितला आणि त्या भामट्या व्यक्तीने तिच्या खात्यातून पैसे लांबवले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर हर्षिताने दिल्ली पोलीस सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवली आहे.
ऑनलाईन व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करा -
ऑनलाईन खरेदी-विक्री आजकाल एकदम सोपी झाली आहे. अॅपवर जायचं, क्लिक करायचं, पैसे भरायचे आणि वस्तू आपल्या घरी येते. मात्र, यातूनच फसवणुकीचे प्रकार वाढू लागलेत. ऑनलाईन व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. नाहीतर सुरक्षीत आणि विश्वसनीय अशाच साईट्सवरून खरेदी करावी. नाहीतर व्यवहार करताना प्रत्यक्ष भेट झाल्यानंतरच पैसे द्यावेत. ऑनलाइन खरेदीमध्ये 'कॅश ऑन डिलिव्हरी' हा पर्याय निवडा. यामुळे तुमची फसवणूक होणार नाही. काळजी न घेतल्यास तुम्हाला लुबाडण्यासाठी ऑनलाईन भामट्यांची फौज बसलेलीच आहे.