भुवनेवार (रायगडा) - ओडिशातील रायगड येथे नुकतीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली. रशियातील सर्वाधिक मानधन घेणारे राजकारणी पावेल अँटोनोव्ह यांचा ओडिशातील हॉटेलमधील खोलीच्या खिडकीतून पडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. (Death Of Two Russian ) याच्या दोन दिवस आधी म्हणजेच गुरुवारीच भारतात एका पार्टीदरम्यान त्यांच्या एका मित्राचा हृदयविकाराच्या झटक्मयाने मृत्यू झाला होता. आठवडाभरात येथे भारतात भेट देण्यासाठी आलेल्या दोन रशियन पर्यटकांचा मृत्यू झाल्याने अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत.
65 वा वाढदिवस साजरा - ओडिशाच्या रायगडमध्ये एका आठवडय़ात दोन रशियन नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे समर्थक पक्ष नेते आणि दिग्गज उद्योगपती पावेल अँटोनोव्ह यांचा समावेश आहे. तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून पडून पावेलचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस अजूनही ही आत्महत्या मानत असले तरी सखोल तपास सुरू आहे. गेल्या आठवडय़ात 22 डिसेंबर रोजी पावेल अँटोनोव्ह यांचा मित्र व्लादिमीर बिदेनोव्ह याचा मृतदेह त्याच हॉटेलच्या खोलीत संशयास्पद स्थितीत सापडला होता. पावेल अँटोनोव्ह यांचा 65 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघेही येथे पोहोचले होते.
बेशुद्धावस्थेत आढळून आले - पावेल अँटोनोव्ह हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या समर्थक पक्षाशी संबंधित आहेत. मात्र, युक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांनी पुतीन यांच्यावर अनेकवेळा टीका केली होती. अँटोनोव्ह हे रशियाच्या व्लादिमीर विभागातील खासदार होते. तसेच 2019 मध्ये रशियाचे सर्वाधिक पगार घेणारे राजकारणी होते. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या तिसऱया मजल्यावरून पडून अँटोनोव्हचा मृत्यू झाला. 65 वषीय पावेल अँटोनोव्ह शनिवारी हॉटेलच्या बाहेर रक्ताच्या थारोळय़ात पडलेले आढळले. तर त्यांचा सहकारी व्लादिमीर बिदेनोव्ह 22 डिसेंबर रोजी त्याच हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले होते. हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरच्या खोलीत तो बेशुद्धावस्थेत आढळून आले होते.
मित्राच्या मृत्यूनंतर पावेल डिप्रेशनमध्ये - व्लादिमीर बिदेनोव्ह आणि पावेल अँटोनोव्ह यांच्यासह चार रशियन पर्यटक एकत्रितपणे पर्यटनाच्या निमित्ताने भारतात आले होते. त्यांनी जितेंद्र सिंग या गाईडच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी बुधवारी रायगड शहरातील एका हॉटेलमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर दुसऱयाच दिवशी म्हणजे गुरुवारी बिदेनोव्ह यांचा आकस्मित मृत्यू झाला. मित्राच्या मृत्यूमुळे पावेल अँटोनोव्ह डिप्रेशनमध्ये गेले होते, अशी माहिती प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी दिली. मित्राच्या अचानक जाण्याचा ताण आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
सीआयडी तपासाचे आदेश - पावेल यांच्या मृत्यूमागील सर्व बाजू तपासल्या जात आहेत. अधिक तपासासाठी त्यांच्यासोबत आलेल्या इतर दोन सदस्यांना तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. ओडिशाचे डीजीपी सुनील कुमार बन्सल यांनी याप्रकरणी सीआयडीला तपासाचे आदेश दिले आहेत. तसेच यासंबंधी तपास यंत्रणा कोलकाता येथील रशियन वाणिज्य दुतावासाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.