अमरावती - कोरोना संकटात अशा काही आश्चर्यकारक घटना घडत आहेत, ज्यावर लोकांना विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. एका व्यक्तीचा देहांत झाला. अंत्यसंस्कार झाले आणि तीच व्यक्ती पुन्हा जिवंत होऊन समोर आली तर! अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात घडली आहे. 70 वर्षीय एका वृद्ध महिलेवर अत्यंसस्कार करण्यात आले. मात्र, त्याच्या काही दिवसानंतर जयाम्मा घरी परतल्या तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ज्या मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यात आले, ती दुसरीच कुणीतरी व्यक्ती असल्याचं पुढे स्पष्ट झालं.
जयम्मा नावाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी 12 तारखेला विजयवाडा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, अचानक त्या 15 तारखेला रुग्णालयातून बेपत्ता झाल्या. त्यानंतर कुटुंबीयांकडून त्यांचा शोध घेण्यात आला. अखेर कुटुंबाला एक मृतदेह सापडला. त्यांनी जयम्मा समजून त्या मृतदेहावर अत्यसंस्कार केले. जयाम्मा यांच्या मृत्यूनंतर 10 दिवसात त्यांच्या मुलाचाही कोरोनाने मृत्यू झाला. या सर्व घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर मोठी शोककळा पसरली होती. यातच जयाम्मा अचानक आज ऑटोतून घरी आल्या. जयाम्मांना जिवंत पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी...
देशात गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 32 हजार 788 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. सध्या देशात 17 लाख, 93 हजार 645 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांमध्ये 3 हजार 207 कोरोना मृत्यूंची नोंद करण्यात आली. यानंतर देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 3 लाख, 35 हजार 102 वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये २ लाख, 31 हजार 456 लोकांनी कोरोनावर मात केल्याचेही मंत्रालयाने सांगितले. आतापर्यंत 2 कोटी, 61 लाख, 79 हजार 85 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.