हैदराबाद - जगभरात दरवर्षी युद्धामुळे हजारो निष्पाप नागरिकांचे बळी जातात. यातील अनेक युद्धात रासायनिक शस्त्रांचा वापर केला जातो. मागील काही वर्षात या घातक रासायनिक शस्त्रांमुळे बळी पडलेल्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने रासायनिक युद्धात बळी पडलेल्यांची स्मृती ठेवण्यासाठी ३० नोव्हेंबर २००५ हा दिवस ठरवला. दरवर्षी जगभरात हा दिवस युद्धबळींचा स्मृती दिन म्हणून पाळला जातो. याद्वारे रासायनिक शस्त्रांचे दुष्परिणामही जगासमोर आणले जातात. जगभरात शांतता आणि सौदार्ह नांदावे म्हणून संयुक्त राष्ट्राने सर्व देशांत रासायनिक शस्त्रांविरोधात २००५ पासून जनजागृती सुरू केली आहे.
रासायनिक शस्त्रे म्हणजे काय ?
रासायनिक शस्त्रे पारंपरिक शस्त्रांपेक्षा जास्त घातक समजली जातात. युद्धात विषारी वायूचा वापर केल्याने त्याचा मोठ्या लोकसंख्येवर परिणाम होता. मृत्यू ओढावणे, त्वचा जळणे, चेतासंस्थेवर परिणाम होणे, पेशींना इजा, श्वसनसंस्थेचे आजार तर कधीकधी विषारी वायू व्यक्तीच्या शरिरात आणि रक्तात सामावून पिढ्यानपिढ्या त्याचे दुष्षपरिणाम भोगावे लागतात.
रासायनिक शस्त्रांचे प्रकार
रासायनिक शस्त्रे हे वायू, द्रव किंवा स्थायू स्वरुपात असू शकतात. या रसायनांचा फक्त मानवावरच नाही तर प्राणी, पक्षी आणि पर्यावरणावरही दुरगामी परिणाम होतात. ही रसायने जमिनीत आणि पाण्यात मिसळली गेल्यास अन्नाद्वारे पुन्हा व्यक्तीच्या शरिरात प्रवेश करू शकतात. विषारी घटक पर्यावरणाचे भागच बनतात. त्याचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतात. एखाद्या परिसरात रासायनिक शस्त्रांचा फवारा केल्यास त्या भागातील जमीनही नापीक होते. त्याचे परिणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागतात. अनेक वेळा रसायनांमुळे जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये अपंगत्व, चेतासंस्थेचे आजार, अनुवांशिक आजार उद्भतात. युद्धानंतर कित्येक वर्ष हे परिणाम त्या भागातील नागरिकांना भोगावे लागतात.
रासायनिक शस्त्रांचा प्रतिबंध करणारी जागतिक संस्था
युद्धात रासायनिक शस्त्रांच्या वापरास प्रतिबंध करण्यासाठी 'ऑरगनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स' (OPCW) ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. नेदरलँडमधील हेग देशात या संस्थेचे मुख्यालय आहे. १९२ देश या संघटनेचे सदस्य आहेत. २०१३ साली जगभरातील सुमारे ९८ टक्के रासायनिक शस्त्रे नष्ट केल्याचे श्रेय या संस्थेला दिले जाते. या कामामुळे संस्थेला नोबेल पारितोषिकही मिळाले आहे.
जग रासायनिक शस्त्रांपासून आणि त्याच्या धोक्यांपासून कायमचे मुक्त करणे हा या संघटनेचा मुख्य हेतू आहे. रसायने ही फक्त मानवाच्या विकासासाठी, शांततेसाठी आणि भरभराटीसाठी वापरली जावी, असा विचार ही संस्था जगभरात पसरवत आहे. ही संस्था संयुक्त राष्ट्रासोबत मिळून काम करते. रासायनिक शस्त्रे परिषदेत घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी या संस्थेकडून करण्यात येते. जगभरात ज्या देशाकडे रासायनिक शस्त्रे आहेत त्यांना नष्ट करण्याचे प्रयत्न ही संस्था करते.
OPCW संघटनेचे मुख्य उद्देश
- रासायनिक शस्त्रांचे उत्पादन, निर्मिती, साठवणूक करण्यास बंदी
- रासायनिक शस्त्रे एका देशाकडून दुसऱ्या देशाला देण्यास बंदी
- रासायनिक शस्त्रांच्या लष्करी वापरावर बंदी
- रासायनिक शस्त्रांच्या वापरापासून जगभरातील देशांना परावृत्त करणे.
- दंगल नियंत्रणात आणताना रासायनिक शस्त्रांवर प्रतिबंध घालणे.
एजंट ऑरेंज आणि व्हिएतनाम युद्ध
१९६१ ते १९७१ या काळात अमेरिकेने व्हिएतनाम युद्धात घातक अशा एजंट ऑरेंज या रसायनाचा वापर केला. मोठमोठाले बॅरल रसायन अमेरिकेच्या लष्कराने व्हिएतमानच्या जंगलांवर फवारले. घनदाट जंगलात लपून बसलेले सैन्य दिसावे तसेच शत्रूला हानी पोहचावी म्हणून अमेरिकेने या रसायनाचा वापर केला. या रसायनांमुळे झांडाची पाणे गळून पडत आणि जंगलेच्या जंगले ओसाड पडत. याचा स्थानिक पर्यावरणावर दुरगामी परिणाम झाला. अजूनही या भागात अपंग मुले जन्माला येत आहे. पाणी, जमीन आणि पर्यावरणात हा वायू मिसळून गेला आहे. युद्ध संपून गेल्यानंतर अनेक वर्ष व्हिएतनामने या घातक रसायनाचा सामना केला. संपूर्ण प्रदेशात महामारी मानवनिर्मित महामारी पसरली होती.