रायपूर : सासू-सुनेच्या भांडणांबाबत आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र, छत्तीसगडच्या बिलासपूरमधील सुनांनी आपल्या दिवंगत सासूचे चक्क मंदिर उभारले आहे. ऐकून आश्चर्य वाटले ना? ही बाब ऐकायला अशक्य वाटत असली, तरी खरी आहे.
दररोज होते पूजा; महिन्यातून एकदा भजन..
तांबोळी परिवारातील ११ सुनांनी मिळून आपल्या सासूचे मंदिर उभारले आहे. याठिकाणी त्या दररोज पूजाही करतात. यासोबतच, महिन्यातून एकदा या मंदिरात भजन-कीर्तनाचा कार्यक्रमही आयोजित केला जातो. तांबोळी कुटुंबात एकूण ३९ सदस्य आहेत. सेवानिवृत्त शिक्षक शिवप्रसाद तांबोळी यांच्या पत्नी गीता यांचे २०१०मध्ये निधन झाले होते. गीता जेव्हा जिवंत होत्या, तेव्हा त्या आपल्या सुनांवर खूप प्रेम करत. त्यांच्या सुनांंनाही आपल्या सासूप्रति तितकाच आदर होता. जिथे आजूबाजूच्या घरांमध्ये दिवसाआड सासू-सुनेचे भांडण होत असे, तिथे गीता मात्र आपल्या सुनांना प्रेमाचे धडे देत.
कुटुंबात होत नाहीत वाद..
शिवप्रसाद यांनी सांगितले, की त्यांच्या चांगल्या संस्कारांनीच कुटुंबीयांना आजच्या काळातही जोडून ठेवले आहे. गीता यांच्या जाण्याबाबत आजही तांबोळी कुटुंबीयांना वाईट वाटते. गीता यांच्या प्रयत्नांमुळेच कुटुंबात सुख, समृद्धी आणि एकी टिकून असल्याचे तांबोळी कुटुंबीय सांगतात. या कुटुंबात कधीही वाद वा तंटे होत नाहीत, कोणताही निर्णय घेताना सर्वांचे मत विचारात घेतले जाते असे शिवप्रसाद यांनी सांगितले.
शिवप्रसाद चालवतात घर..
शिवप्रसाद यांनी आपले भाऊ आणि मुले यांमध्ये कधीही भेदभाव नाही केला. निवृत्त झाल्यानंतर त्यांना मिळालेली रक्कम ही सर्वांमध्ये वाटण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसेच, आता त्यांना जी पेन्शन मिळते, त्यातून पूर्ण घराचा खर्च चालतो.
घरातील सर्व सुना सुशिक्षित..
गीता यांना स्वतःची तीन मुले आहेत. त्यांच्या तीन सुना उषा, वर्षा आणि रजनी या आहेत. तसेच, गीता देवी यांचे दीर आणि त्यांचे कुटुंबीयही याच घरात राहतात. अशा प्रकारे एकत्र कुटुंबपद्धतीमुळे गीता यांना एकूण ११ सुना आहेत. या सर्व सुना या सुशिक्षित आहेत. त्यांपैकी कित्येक बाहेर नोकरीही करतात, आणि घरकामातही मदत करतात. एक आदर्श कुटुंब म्हणून तांबोळी कुटुंबीय प्रसिद्ध आहेत.
हेही वाचा : देशातील एकमेव सासू-सुनेचे मंदिर बीडमध्ये