नवी दिल्ली - पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकींचे पार्थिव तालिबानने अफगाणिस्तानातील आंतरराष्ट्रीय रेडक्रासला सोपवले आहे. पार्थिव भारतात पाठवण्यासाठी काबुल स्थित भारतीय राजदूतावास अफगाणिस्तान सरकारच्या संपर्कात आहे. शुक्रवारी अफगाणिस्तानातील कंधारमध्ये कव्हरेज दरम्यान मृत्यू झाला. सिद्दिकी हे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्ससाठी काम करत होते. दानिश यांच्या पार्थिवासंदर्भातील माहिती कुटुंबीयांना परराष्ट्र मंत्रालयाकडून पुरवण्यात येत आहे.
दानिश यांच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी दानिशसोबत फोनवर बोलून झाले होते. तेव्हा तो चिंतित वाटला नाही, असे त्यांच्या वडिलांनी सांगितले. दानिश यांचे वडिल अख्तर सिद्दीकी प्राध्यापक असून जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठात कार्यरत आहेत. दानिश यांचे पार्थिव भारतात आणण्यात येणार असल्याचे विदेश मंत्रालयाने सांगितले आहे. दानिश यांना दोन मुले आहेत.
दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानचं लष्कर आणि तालिबानींच्या संघर्षात मृत्यू झाला. दानिश सिद्दीकी हे रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थेचे मुख्य फोटोग्राफर होते. गेल्या काही दिवसांपासून ते अफगाणिस्तानात सुरू असलेल्या संघर्षाचं वृत्तांकन करत होते. रोहिंग्या निर्वासितांचे वृत्ताकंन केल्याप्रकरणी त्यांना फीचर फोटोग्राफी श्रेणीत 2018 मध्ये पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
दानिश सिद्दीकी हे मुळचे मुंबईचे रहिवासी होते. त्यांनी दिल्लीमध्ये जामिया मिलिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली होती. 2007 मध्ये त्यांनी जामियाच्या एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरमधून जनसंपर्क विषयांत पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएशन) पूर्ण केली होती. पत्रकारितेतील सुरुवात त्यांनी एका वृत्तवाहिनीवर प्रतिनिधी म्हणून केली होती. नंतर ते फोटो जर्नालिस्ट बनले. 2010 मध्ये त्यांनी रॉयटर्समध्ये इंटर्न म्हणून कामाला सुरुवात केली होती. रॉयटर्सचे संपादक अलेस्नद्रा गलोनी यांनी सिद्दीकीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, 'दानिश हा उत्कृष्ट पत्रकार होतो. तो एक चांगली पती, वडील आणि सहकारी होता. दानिच्या कुंटुंबीयांबद्दल आमची सहानुभूती आहे'.
दानिश यांच्या मृत्यूवर काँग्रेस नेते राहुल गांधी, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, कॉमेडी आर्टिस्ट कुणाल कामरा यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. दानिश सिद्दीकी यांचे मित्र बिलाल जैदी यांनी सांगितले, की दानिशच्या मृत्यूची बातमी आम्हाला धक्का देणारी आहे. दानिश एक उत्तम छायाचित्रकार होता. त्याने रोहिंग्या प्रकरण आणि दिल्ली दंगलीचे कव्हरेज केले होते. त्याचे पार्थिव लवकरात लवकर मिळावे, अशी आपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
अफगाणिस्तानात संघर्ष -
अफगाणिस्तानच्या कंदहार जिल्ह्यातील स्पिन बोल्डक येथील मुख्य बाजारपेठेवर कब्जा करण्यासाठी अफगाण सैन्य व तालिबान यांच्यात सध्या संघर्ष सुरू आहे. अमेरिकेचे अफगाणिस्तानातील सैन्य माघारी जात असल्याने अफगाणिस्तानच्या बहुसंख्य भागावर ताबा घेण्यासाठी तालिबान सरसावले आहेत.