कोलकाता : एका मजुराच्या खात्यात 100 कोटी रुपये जमा झाल्याने खळबळ उडाली आहे. विषेष म्हणजे या मजुराला त्याच्या खात्यात 100 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती नव्हती. नसीरुल्ला मंडल असे त्या 100 कोटी रुपये खात्यात जमा झालेल्या मजुराचे नाव आहे. पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर या मजुराला त्याच्या खात्यात इतकी मोठी रक्कम जमा झाल्याची माहिती मिळाली. मात्र एकीकडे 100 कोटी रुपये जमा झाल्याचा आनंद आहे, तर दुसरीकडे पोलिसांचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यामुळे या मजुराची सध्या पाचात धारण बसली आहे.
पोलिसांनी नोटीस बजावल्याने उघड झाली घटना : पश्चिम बंगालमधील देगंगा येथे राहणारे रोजंदारी मजूर नसीरुल्ला मंडल यांना सायबर क्राईमकडून नोटीस मिळाली आहे. या नोटीसमध्ये त्यांना त्यांच्या खात्यात शंभर कोटी रुपये कोठून आले हे सांगण्यास सांगितले आहे. या घटनेतील विशेष म्हणजे नोटीस येण्यापूर्वी नसिरुल्ला मंडल यांनाही त्यांच्या खात्यात १०० कोटी रुपये असल्याची माहिती नव्हती. त्यामुळे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर नसीरुल्ला यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
मजुरीवर चालते सहा जणांचे कुटूंब : नसिरुल्ला मंडल हा देगंगा येथील चौराशी पंचायतीच्या वासुदेवपूर गावचा रहिवासी आहे. तो रोजंदारी मजुरी करून ते सहा जणांचे कुटुंब चालवतो. नसिरुल्ला मंडल याने सरकारी बँकेत खाते उघडल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मात्र हे खाते सायबर क्राइम विभागाच्या आदेशानुसार आधीच गोठवण्यात आले आहे. नसिरुल्ला मंडल याने त्याच्या बँक खात्यात कधीच हजार रुपयांपेक्षा जास्त रुपये ठेवले नसल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
नोटीस आली तेव्हा समजले 100 कोटी आले : रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचे नसीरुल्ला मंडलने यावेळी सांगितले. नोटीस आणि खात्यात मिळालेले 100 कोटी रुपये याबाबत विचारले असता त्याने मी फारसा शिकलेला नसल्याने मला इंग्रजी येत नाही. नोटीस आली तेव्हा समजू शकले नाही. तेव्हा एका सुशिक्षित माणसाने मला सांगितले ही पोलीस स्टेशनची नोटीस आहे. मला माझी सर्व ओळखपत्रे घेऊन मुर्शिदाबाद पोलीस स्टेशनला जावे लागेल. तेव्हाच मला कळाले की कुठूनतरी माझ्या खात्यात 100 कोटी रुपये आले आहेत.
सायबर क्राईम शाखेने बोलावले चौकशीसाठी : मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम शाखेने देगंगा पोलीस स्टेशनद्वारे नसिरुल्लाला नोटीस पाठवली आहे. ती नोटीस येताच ही बाब उघडकीस आली. नोटीसनुसार नसीरुल्लाला आवश्यक कागदपत्रांसह 30 मे पर्यंत मुर्शिदाबाद पोलीस स्टेशन गाठावे लागणार आहे. मात्र या नोटिशीनंतर नसीरुल्ला तातडीने त्याचे खाते असलेल्या सरकारी बँकेत धाव गेतली. मात्र तेथे सायबर क्राईमच्या सांगण्यावरून त्याचे खाते बँकेने गोठवल्याची माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा -