नवी दिल्ली - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने आता रौद्ररुप धारण केले आहे. हे चक्रीवादळ मंगळवारी सकाळी गुजरातची किनारपट्टी ओलांडून पुढे जाईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने रविवारी दिली. या वादळाने रविवारी पहाटेच्या सुमारास अतितीव्र स्वरुप धारण केले आहे. हे चक्रीवादळ रात्री अडीचच्या सुमारास अरबी समुद्रात गोव्यापासून १५०, मुंबईपासून ४९०, तर गुजरातपासून ७३० किलोमीटर दूर असल्याचेही सांगण्यात आले.
तौक्ते चक्रीवादळामुळे आज गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्नागिरी किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तौक्ते वादळ मंगळवारी(१८ मे) सकाळी गुजरातच्या पोरबंद आणि महुवा किनारपट्टीवरून पुढे सरकेल, अशी माहिती हवामाना विभागाने दिली आहे.
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मच्छिमारांना मासेमारी करण्यास न जाण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. केरळा, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र या राज्यांच्या किनारपट्टी भागासह दक्षिण पश्चिमकडील भागात मच्छीमारी करण्यास प्रतिंबध घालण्यात आले आहेत.
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उच्च स्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी किनारपट्टी भागातील राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच या वादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायू दलाची १६ कार्गो विमाने आणि १८ हेलिकॉप्टर आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच एनडीआरएफने देखील किनारपट्टी भागातील केरळा, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्याच्या किनारपट्टी भागात ५० तुकड्या तैनात केल्या आहेत.