नवी दिल्ली : चक्रीवादळ बिपरजॉय रुद्र रुपधारण करण्याची शक्यता आहे. येत्या 12 तासात हे चक्रीवादळ पूर्व-मध्य आणि आग्नेय भागातील अरबी समुद्रावर अतिशय तीव्र होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. पूर्व-मध्य आणि आग्नेय अरबी समुद्रावरील 'बिपरजॉय' चक्रीवादळ गेल्या 6 तासांमध्ये 5 किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकले आहे. काही वेळातच ते अतिशय तीव्र चक्रीवादळात रुपांतरीत झाले, असल्याची माहिती हवामान विभागाने ट्विटद्वारे दिली. दरम्यान महाराष्ट्रातील मान्सूनवर या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे.
किती अंतरावर आहे चक्रीवादळ : IMD नुसार, चक्रीवादळ सध्या गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 860 किमी. तर मुंबईपासून 970 किमी दक्षिण-पश्चिम भागात आहे. गुजरातच्या पोरबंदरपासून 1 हजार 60 किमी अंतरावर दक्षिण-नैऋत्य भागात आहे. तर कराचीच्या दक्षिणेस 1 हजार 350 किमी अंतरावर हे वादळ आहे. हे चक्रीवादळ पुढील 24 तासांत जवळ-जवळ उत्तरेकडे आणि नंतर 3 दिवसामध्ये उत्तर-वायव्य दिशेच्या बाजूने सरकेल. दरम्यान हे चक्रवादळाचे अंतिम गंतव्य ठिकाण कोठे आहे आणि याचे लॅण्डफॉल कुठे होऊ शकते हे अद्याप स्पष्ट नाही. या आठवड्याच्या अखेरीस त्याची स्थिती स्पष्ट होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
महाराष्ट्रात कधी येणार मान्सून : या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला आहे. आज नैऋत्य मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. हवामान खात्याने याची औपचारिक घोषणा केली आहे. केरळच्या काही भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू झाला. मान्सूनला यंदा तब्बल सात दिवस विलंब झाला आहे. साधरण मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो. परंतु अद्याप आपण या मान्सूनच्या प्रतिक्षेत आहोत. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तळकोकणात 16 जून किंवा त्यानंतरच मान्सून दाखल होईल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बिपरजॉय या चक्रीवादळामुळे पावसाचे प्रमाण कमी असणार आहे. साधरण 12 जूनच्या आसपास बिपरजॉय चक्रीवादळ क्षीण होईल. वादळ क्षीण होऊपर्यंत मॉन्सूनच्या पावसाचे प्रमाण कमी असणार आहे.
वेगाने वाहणार वारे : अहमदाबादमधील हवामान विभागाच्या संचालक मनोरमा मोहंती यांनी मीडियाला सांगितले की, चक्रीवादळ पोरबंदर जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिमेला सुमारे 1 हजार 060 किमी अंतरावर आहे. या चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळामुळे हवामान आणि समुद्राची स्थिती पुढील काही तीन-चार दिवसात येथे वारे 135ते 145 किमी प्रतितास ते 160 किमी प्रतितास वेगाने वाहू शकतात. याची दक्षता घेत हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. मच्छिमारांना १४ जूनपर्यंत अरबी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.या चक्रीवादळामुळे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या भागात 9 ते 11 जून दरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -