त्रिशूर (केरळ) : त्रिशूर सायबर क्राईम पोलिसांनी शुक्रवारी दोन तरुणांना अटक केली. बँकेच्या चुकीमुळे त्यांच्या खात्यात 2.44 कोटी रुपये आले होते. (Crores deposited in bank account by mistake). त्रिशूरमधील कांजनीजवळील अरिमबुरचे मूळ रहिवासी निधी आणि मनू यांना त्यांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे आढळल्याने त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्या तरुणांनी आयफोनसारख्या महागड्या वस्तूंवर पैसे उधळण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सांगितले की, तरुणांनी पैसे वापरून कर्ज फेडले आणि शेअर ट्रेडिंग देखील केले. या तरुणांनी एकूण सुमारे 2.44 कोटी रुपये खर्च केले होते. खात्यातील उर्वरित रक्कम नंतर 19 वेगवेगळ्या बँकांमधील 54 इतर खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली. (money in bank account by mistake in kerala).
बॅंकेच्या सर्व्हरमध्ये चूक : बँकेच्या अधिकाऱ्यांना गहाळ झालेले पैसे लक्षात आले आणि त्यांनी व्यवहार शोधून काढले. चुकीच्या पद्धतीने जमा झालेली बहुतांश रक्कम तरुणांनी खर्च केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून तरुणांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, ज्या बँकेत तरुणांचे खाते होते, ती दुसऱ्या बँकेत विलीन होत असताना सर्व्हरमध्ये चूक झाली आणि तरुणांच्या खात्यात चुकीच्या पद्धतीने पैसे जमा झाले. या तरुणांनी बँकेच्या सर्व्हरमध्ये फेरफार करून पैसे काढून घेतल्याची शक्यताही पोलीस तपासत आहेत. या तरुणांचा यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नसल्याचे पोलिसांनी सांगितले.