कोलकाता : कोलकाता पोलिसांनी सोमवारी एका 'करोडपती' चोराला ताब्यात घेतले. हा चोर अलिशान गाड्यांमध्ये फिरायचा आणि कॉर्पोरेट नामवंताप्रमाणे फॉर्मल कपडे घालायचा. या चोराने 25 वर्षांत 14 राज्यांमध्ये सुमारे तब्बल 1,200 घरफोड्या केल्या आहेत.
मुंबई आणि पुण्यात कोट्यवधींची मालमत्ता : पोलिसांनी सांगितले की, नदीम कुरेशी (45) याच्या नावावर मुंबई आणि पुण्यात कोट्यवधींची मालमत्ता आहे. त्याची किशोरवयीन मुले नामांकित शाळांमध्ये शिकतात. गाझियाबाद पोलिसांनी त्याला तिहार तुरुंगातून बंगालमध्ये आणले.
तो देशभरात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाँटेड आहे. त्याची कार्यपद्धती अनोखी होती, त्यामुळे तो सहज पोलिसांच्या हाती लागायचा नाही. 2021 मध्ये, कोलकात्यातील दोन फ्लॅटवर 12 लाख रुपयांचा दरोडा टाकल्यानंतर आम्ही प्रथम त्याचा शोध घेतला होता. मात्र तेव्हा तो आमच्या तावडीतून सुटला. - वरिष्ठ अधिकारी, बिधाननगर पोलीस स्टेशन
2021 मध्ये अटक केली होती : राजस्थान पोलिसांनी 2021 मध्ये त्याला अटक केली. गाझियाबादमधील घरफोडीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्याला तिहार तुरुंगात हलवण्यात आले. तो 2021 पासून तेथे बंद होता. कोलकाता पोलिसांनी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर प्रॉडक्शन रिमांड ठेवला होता, ज्याला गेल्या आठवड्यात परवानगी मिळाली. आता गाझियाबाद पोलिसांनी त्याला बंगालमध्ये आणले आहे. कोलकाताच्या सॉल्ट लेक न्यायालयाने त्याला सात दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे.
17 व्या वर्षापासून घरफोडीला सुरुवात : इयत्ता पाचवीपर्यंत शिकलेला कुरेशी गाझियाबादमधील त्याच्या मूळ गावात गुरे चोरायचा. तेथून त्याने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. वयाच्या 17 व्या वर्षापासून त्याने घरफोडीला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत त्याने दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान, ओडिशा आणि इतर राज्यांमध्ये घरफोड्या केल्या आहेत. पोलीस आता या सर्व घरफोड्यांचे कनेक्शन शोधत आहेत.
तो फॉर्मल कपड्यात फिरायचा. तो कमी सुरक्षा असलेल्या किंवा एकाकी इमारतींमध्ये प्रवेश करायचा. इमारतीच्या वरच्या भागात तो लिफ्टने जायचा. तेथून तो पायऱ्या उतरून कुलूपबंद घरे तपासायचा. ज्या घरांना जास्त वेळापासून कुलूप नाही अशांना तो टार्गेट करायचा. तो फक्त सोन्याची आणि कॅशची चोरी करत असे. - पोलीस अधिकारी
'नदीम गँग' नावाची टोळी बनवली होती : नदीम कुरेशीला आतापर्यंत किमान आठवेळा अटक करण्यात आली आहे. तो किमान 23 प्रकरणांमध्ये घोषित गुन्हेगार आहे. त्याने 'नदीम गँग' नावाची टोळी बनवली होती. या टोळीला तो त्याच्याप्रमाणे घरफोडी करण्याचे ट्रेनिंग द्यायचा.
हेही वाचा :