अहमदाबाद : पीएमओमध्ये अतिरिक्त संचालक म्हणून अनेकदा जम्मू - काश्मीरला भेट देणाऱ्या किरण पटेल याच्या विरोधात अहमदाबाद गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता या प्रकरणी त्याची पत्नी मालिनी पटेल हिला देखील अटक करण्यात आली आहे.
व्यवहारासाठी पत्नीचे बँक खाते वापरले : माजी मंत्र्यांच्या भावाच्या बंगल्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली लूट केल्याप्रकरणी किरण पटेल आणि मालिनी पटेल यांच्यावर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात किरण पटेलच्या पत्नीचाही सहभाग आहे. किरण पटेलने व्यवहारासाठी पत्नीचेच बँक खाते वापरले होते. मालिनी पटेलला तिच्या नातेवाईकाच्या घरून अटक करण्यात आली असून आता गुन्हे शाखा मालिनी पटेलची चौकशी करत आहे.
अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला : यापूर्वी मालिनी पटेल हिने अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळल्याने अखेर तिला अटक करण्यात आली. अहमदाबाद क्राइम ब्रँचमध्ये किरण पटेलविरोधात तक्रार दाखल होताच, ट्रान्सफर वॉरंटसह त्याला अटक करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक जम्मू - काश्मीरमध्ये पोहोचले होते. त्याला या आठवड्यात केव्हाही अहमदाबादला आणण्यात येईल.
मालिनी पटेल फरार झाली होती : शीलज येथील बंगला दुरुस्तीच्या नावाखाली बंगल्याच्या बाहेर नावाची पाटी लावून 18 कोटी रुपये किमतीचा बंगला चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या किरण पटेल याच्या विरोधात माजी मंत्र्यांच्या भावाने गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. किरण पटेल याने गेल्या 15 वर्षांपासून घोडासर घराचे भाडे भरले नसल्याचे समोर आले आहे. किरण पटेल हा पत्नी मालिनी पटेल व कुटुंबासह घोडासर येथील प्रेस्टिज बंगलो सोसायटी ए - 17 मध्ये राहत होता. किरण पटेलला अटक केल्यानंतर त्याची पत्नी मालिनी पटेल हिने घरातून पळ काढला होता.
पोलिसांनी केली चौकशी सुरू : सध्या या संपूर्ण प्रकरणात गुन्हे शाखेने मालिनी पटेल हिला जंबुसर येथून ताब्यात घेऊन तिची कोरोना चाचणी केली. तसेच पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर याप्रकरणी तिची चौकशी केली जात आहे. याबाबत अहमदाबाद शहर गुन्हे शाखेचे डीसीपी चैतन्य मंडलिक यांनी ईटीव्ही भारतशी दूरध्वनीवरून संभाषण करताना सांगितले की, मालिनी पटेल हिला ताब्यात घेऊन तिला अटक करून अधिक चौकशी केली जात आहे.