नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. केंद्र सरकारकडून लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो देण्यात येत होता. मात्र, पश्चिम बंगाल सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा फोटो राज्य सरकारने खरेदी केलेल्या सर्व प्रमाणपत्रांवर छापण्यात येत आहे. यामुळे केंद्र आणि राज्यातील संघर्षात आणखी एक ठिणगी पडली आहे.
![Covid vaccine certificates in Bengal to bear CM Mamata's picture](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12026326_yu.jpg)
देशात कोरोनाचा कहर असून त्यावर नियंत्रण मिळण्यासाठी गेल्या 16 जानेवरीपासून लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. ज्या व्यक्तींना लस घेतली आहे. त्यांनी लसीकरण प्रमाणपत्र देण्यात येत आहे. लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचे छायाचित्र छापण्यात आले होते. लसीकरण प्रमाणपत्रावर छायाचित्र छापून पंतप्रधान मोदींची प्रसिद्धी करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र, आता इतर राज्यांकडून लस प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्याचे छायाचित्र छापण्यात येत आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीवेळी लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापल्यामुळे तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, आता तेच कृत्य टीएमसीने केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये तीसऱ्या टप्प्यामध्ये लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. ममता यांचा फोटो असलेले लस प्रमाणपत्र 18-44 वर्षांच्या लोकांना देण्यात येत आहे. यापूर्वी झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांनीदेखील लस प्रमाणपत्रावर छापला जाणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवला होता. या राज्यांत आता कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत एकूण 36.1 कोटीहून अधिक चाचण्या पार पडल्या आहेत. तर देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 22 कोटी 78 लाखांहून अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत.