नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांमध्ये 36 हजार 604 नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, 43 हजार 62 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 94 लाख 99 हजार 414 वर पोहोचली असून, आतापर्यंत 89 लाख 32 हजार 647 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे मुत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 1 लाख 38 हजार 122 वर पोहोचला आहे. दररोज नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 5 हजार 600 जणांना कोरोनाची लागण
राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 5,600 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 111 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 5 हजार 27 जणांनी बुधवारी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 18 लाख 32 हजार 176 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 16 लाख 95 हजार 208 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 47 हजार 357 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कर्नाटकात कोरोनावरील लसीच्या क्लिनिकल चाचणीला सुरुवात
'भारत बायोटेक'ने विकसित केलेल्या "कोव्हॅक्सिन" या कोरोनावरील लसीच्या क्लिनिकल चाचणीला बुधवारपासून राज्यात सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी ही माहिती दिली. ते पुढे बोलताना म्हणाले की कोरोनावरील लसीच्या चाचणीला राज्यात सुरुवात झाली असून, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. दरम्यान राज्यात 2021 च्या सुरुवातील कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे कर्नाटकच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालने, तसेच सार्वजनिक उत्सवांवर बंधने आणने यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू होऊ शकतात अशी माहिती यावेळी देण्यात आली.
आयसीएमआरकडून मंजूरी मिळाल्यानंतर पंजाबमध्ये कोरोना लसीची चाचणी होणार
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) ने कोरोनाच्या लसीला मंजुरी दिल्यानंतर पंजाबमध्ये कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात करणारा असल्याची माहिती पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी दिली. तसेच त्यासाठी राज्यातील 1 लाख 20 हजार आरोग्य कर्मचारी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुजरातमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई
गुजरातमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर सरकारकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. मास्क न घातला व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळून आल्यास त्याला कोविड केअर सेंटरमध्ये सेवा द्यावी लागणार आहे. दरम्यान राज्य सराकाच्या या निर्णयाचे न्यायालयाने देखील समर्थन केले आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी हा योग्य निर्णय असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र ही सेवा वैद्यकीय सेवेसी संबधित नसावी असे न्यायालयाने म्हटले आहे. जसे की जो व्यक्ती मास्क घालणार नाही, त्याला कोविड सेंटरमध्ये साफसफाई, स्वयंपाकात मदत अशा प्रकारची कामे देण्यात यावीत असे न्यायालयाने म्हटले आहे.