नवी दिल्ली - कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत 30 हजार 254 नव्या रुग्णांची आणि 391 मृत्यूची नोंद झाली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्णांचा रिकव्हरी रेट 94.93 वर पोहचला आहे. तर मृत्यूचा दर 1.45 आहे.
देशात एकूण कोरोना रुग्णांची सख्या 98 लाख 57 हजार 29 झाली आहे. तर 1 लाख 43 हजार 19 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 93 लाख 57 हजार 464 जण कोरोनामुक्त झाले आहते. तर 3 लाख 56 हजार 546 जणांवर देशातील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
कोरोना रुग्णांनी 7 ऑगस्टला 20 लाख, 23 ऑगस्टला 30 लाख, 5 सप्टेंबरला 40 लाख, 16 सप्टेंबरला 50 लाख, 28 सप्टेंबरला 60 लाख, 11 ऑक्टोंबरला 70 लाख, 29 ऑक्टोबरला 80 लाख आणि 20 नोव्हेंबरला 90 लाखाचा टप्पा पार केला.
15 कोटी कोरोना चाचण्या -
आज सकाळी आठ वाजेपर्यंत मृत्यू झालेल्या 391 रुग्णांमध्ये महाराष्ट्रात 80, दिल्लीत 47, पश्चिम बंगालमध्ये 44, केरळमध्ये 32, उत्तर प्रदेशमध्ये 31 आणि पंजाबमध्ये 21 रुग्णांचा बळी गेला आहे. याचबरोबर मंगळवारी दिवसभरात 10 लाख 14 हजार 434 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तर आतापर्यंत एकूण 15 कोटी 37 लाख 11 हजार 833 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत.
महाराष्ट्रात सर्वांत जास्त मृत्यू -
आतापर्यंत सर्वांत जास्त 48 हजार 139 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाबमध्ये मृत्यू दर जास्त आहे.
हेही वाचा - 'नोटा'चा पर्यायच नाही; गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणूक रद्द करण्याची शिवसेनेची मागणी