बेंगळुरू : कर्नाटकातील विरोधी पक्षाचे नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांची तुलना टिपू सुलतानशी करत त्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर टीका केल्यामुळे वादात सापडलेल्या 'सिद्दू निजाकनासुगलु' (Siddu Nijakanasugalu) या पुस्तकाच्या प्रकाशनास कर्नाटकच्या स्थानिक न्यायालयाने स्थगिती दिली आहे. (court stays book release on Siddaramaiah). या पुस्तकात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या काळातील कथित कुशासन आणि त्यांचे तुष्टीकरणाचे राजकारण यावर भाष्य केले आहे. (Siddaramaiah on book on himself).
पुस्तकामागे भाजपचा हात असल्याचा आरोप : या पुस्तकात काही वादग्रस्त आणि जातीयदृष्ट्या संवेदनशील मुद्दे तसेच माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळाशी संबंधित घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना सिद्धरामय्या यांनी सोमवारी सांगितले की, कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा अपमान करण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी या पुस्तकाला बदनामीकारक असे संबोधले आहे. सिद्धरामय्या यांनी पुस्तकामागे भाजपचा हात असल्याचा देखील आरोप केला आहे. 'निवडणुकीपूर्वी माझा अपमान करण्याच्या उद्देशाने ते एक पुस्तक आणत आहेत. हे पूर्णपणे बदनामीकारक आहे. कायदेशीररित्या काय करायचे ते मी बघेन,' असेही ते पुढे म्हणाले.
मुखपृष्ठावर सिद्धरामय्या यांचे टिपू सुलतान दृष्य चित्र : सोमवारी पुस्तक लाँच कार्यक्रमाच्या पोस्टर्समध्ये पुस्तकांच्या प्रती दाखवल्या आहेत. याच्या मुखपृष्ठावर सिद्धरामय्या यांनी टिपू सुलतानसारखा पोशाख घातलेला आणि हातात तलवार धरलेली आहे. पोस्टरनुसार या कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च शिक्षण मंत्री सी एन अश्वथ नारायण असतील. ते या पुस्तकाचे प्रकाशनही करतील. भाजप आमदार चलवादी नारायणस्वामी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आहेत. तसेच कार्यक्रमाला पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समितीचे प्रमुख लेखक रोहित चक्रतीर्थ, पत्रकार संतोष थम्मय्या, विक्रम संवादचे संपादक वृषांका भट आणि लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते राकेश शेट्टी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाविषयी ट्विट करून आणि लोकांना सहभागी होण्यास सांगताना अश्वथ नारायण म्हणाले, 'सिद्दू निजाकनसुगलु या पुस्तकाद्वारे अनेक संवेदनशील मुद्द्यांचा खुलासा करण्यासोबतच अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नाचे मी कौतुक करतो. मी पुस्तकाच्या सार्वजनिक शुभारंभात सहभागी होणार आहे.'
पुस्तकाचे प्रकाशन रोखण्यास याचिका : दरम्यान, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कायदेशीर कक्षाने या कार्यक्रमाला परवानगी दिल्यास ती रद्द करावी आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन आयोजकांना परवानगी देऊ नये, अशी याचिका पोलिसांकडे केली आहे. सद्भावना आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट रचून सिद्धरामय्या यांचे चरित्र विकृत करण्यात आले आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.