शिवसागर (आसाम) : विवाहित मुलीची मातृत्वाची इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवसागर जिल्ह्यात एका जोडप्याने 10 महिन्यांच्या बाळाला हिसकावून बाळाच्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Couple kills mother of 10 month old baby). सिमालुगुरी पोलिस स्टेशन अंतर्गत केंदुगुरीच्या बैलुंग गावातील रहिवासी नितुमोनी लुखुराशन तिच्या 10 महिन्यांच्या बाळासह गेल्या सोमवारपासून बेपत्ता होती. मंगळवारी, नितुमोनी यांचा मृतदेह चरईदेव जिल्ह्यातील राजाबारी टी इस्टेटच्या नाल्यात सापडला होता. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. (Assam Crime News)
आरोपींना रेल्वे स्थानकावरून अटक : शिवसागर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून मंगळवारी संध्याकाळी एका जोडप्याला सिमालुगुरी रेल्वे स्थानकावरून अटक केली. बसंता गोगोई आणि हियामाई गोगोई हे जोडपे हिमाचल प्रदेशला जाण्यासाठी ट्रेनची वाट पाहत होते. त्या दोघांच्या कबुली जबाबाच्या आधारे पोलिसांनी त्यांचा मुलगा प्रशांत गोगोई याला अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 10 महिन्यांच्या बाळाची सुटका केली आहे.
बोथट वस्तूंनी हल्ला करून हत्या : शिवसागरचे पोलीस अधीक्षक सुभज्योती बोराह यांनी बुधवारी नितुमोनी लुखुराशनची हत्या आणि तिच्या बाळाचे अपहरण करण्यामागील हेतू उघड केला. "हे पूर्वनियोजित होते", असे एसपींनी सांगितले. त्यांनी सांगितले की गोगोई जोडप्याने हा गुन्हा केवळ त्यांच्या विवाहित मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केला. या दाम्पत्याने नितुमोनीला काही कामाच्या नावाखाली बाळासह बोलावले आणि तिच्याकडून बाळ हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. नितुमोनीने प्रतिकार केला असता दाम्पत्याने तिच्यावर काही बोथट वस्तूंनी हल्ला करून तिची हत्या केली.