नवी दिल्ली - संपूर्ण देशात कोरोना लस मोफत मिळणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केले होते. मात्र, त्यांनी लगेच युटर्न घेतला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फक्त प्राधान्य देण्यात आलेल्यांनाच लस मोफत मिळणार आहेत. पहिल्यांदा देशभरातील १ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मोफत दिली जाणार आहे. त्यानंतर दोन कोटी आघाडीवर काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना लस मोफत दिली जाणार आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे.
सीरमच्या लसीला मिळाली परवानगी -
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून तयार करण्यात येणाऱ्या 'कोविशिल्ड' या कोरोनावरील लसीला भारतात परवानगी मिळाली आहे. काल (शुक्रवार) भारताचे औषध महानियंत्रक कार्यालयातील अधिकारी आणि कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञ गटाची दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. भारतात लसीला परवानगी मिळाल्यानंतर लसीकरणाला लवकरच सुरूवात होईल. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अस्त्राझेनेका कंपनीशी सहकार्य करत सीरमने कोविशिल्ड लस तयार केली आहे.
कोरोनावरील तज्ज्ञ गटाची झाली बैठक -
भारतीय औषध महानियंत्रक कार्यालय (डीजीसीए) आणि केंद्र सरकारच्या कोरोनावरील तज्ज्ञ गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात सीरमच्या लसीला मान्यता देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आता भारतात लसीकरणाला सुरूवात होणार आहे. सीरम इन्सिट्यूट कंपनीने आधीच लसीचे सुमारे ५ कोटी डोस तयार करून ठेवले आहेत.
आजपासून भारतात लसीचा ड्राय रन
देशात कोरोनाचा प्रसार झाला असून त्याला आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशाचे लक्ष कोरोना व्हॅक्सीनकडे लागले आहे. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशामध्ये ड्राय रन सुरू करण्यासाठी सरकार तयारीला लागेल आहे. ऐन लसीकरणामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, त्यांचे आधीच निरसरन करण्यासाठी ड्राय रन म्हणजेच लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात येत आहे. ड्राय रन संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 31 डिसेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीमध्ये आरोग्य मंत्रालायचे प्रमुख सचिव आणि राज्य, केंद्रशासित प्रदशांचे आरोग्य अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता.