मंगळुरू (कर्नाटक) - पोलीस आयुक्तांना आत्महत्या करत असल्याचा फोन लावून एका दम्पत्याने आपली जीवनयात्रा संपवल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटक राज्यात घडला. पत्नीला म्यूकरमायकोसिसची लक्षणं जाणवल्याने तीने अगोदर गळफास घेतला आणि त्यानंतर पतीनेही मृत्यूला कवटाळले. मात्र काही वेळाने त्या दोघांचाही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटक राज्यातील सुरात्काल येथील चित्रपूर याठिकाणी राहेजा अपार्टंमेन्टमध्ये ही धक्कादायक घटना घडली. रमेश कुमार आण गुना कुमार अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावं आहेत.
आत्महत्येपूर्वी पोलीस आयुक्तांना केला फोन -
मंगळुरूचे पोलीस आयुक्त शशीकुमार यांना रमेश यांनी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान फोन केला. त्यात म्हटले की, आम्ही दोघेही कोरोना संक्रमित झालो आहोत. माझ्या पत्नीने आत्महत्या केली आहे. आता मी सुद्धा आत्महत्या करित आहे. आमचा अंत्यसंस्कार कराल, असे म्हणत फोन कट केला. पोलीस आयुक्तांनी पुन्हा फोन केला मात्र रमेशकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. पोलीस आयुक्त शशीकुमार यांनी तात्काळ ही माहिती सोशल मिडियावर टाकून त्यांचे प्राण वाचवण्याचे आवाहन केले. तसेच स्थानिक पोलिसांनी याची माहिती दिली. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्या दोघांनीही मृत्यूला कवटाळे होते.
पत्नीने लिहिली सुसाईड नोट -
पोलिसांनी पत्नी गुना कुमार हिने लिहिलेली सुसाईड नोट जप्त केली आहे. यामध्ये, 'माझ्यात म्यूकरमायकोसिसचे लक्षण असून ते भविष्यासाठी घातक आहे. शिवाय याचा त्रास माझ्या पतीला देखील होऊ शकतो. त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे' असे नमूद केले आहे.
रमेशने मित्रांना पाठविला मॅसेज -
रमेशने देखील आत्महत्येपूर्वी आपल्या मित्रांना एक व्हाईस मॅसेज पाठवला होता. त्यात असे म्हटले की, माझी पत्नी कोरोनाग्रस्त असून ती गंभीर आहे. आम्ही दोघांनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. गुनाने 40 पेक्षा अधिक गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला. त्यानंतर तीने पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवले. त्यामुळे आता मी सुद्धा आत्महत्या करित आहे. तसेच माझ्या आई-वडीलांची काळजी घ्या. माझ्याकडे एक लाख रुपये आहे, त्यामध्ये आमच्यावर अंत्यसंस्कार करा. तसेच तुम्ही माझं घर विकून गरीब लोकांना काही वस्तू दान करू शकता.