नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) नेत्याची निवड करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक सुरू झाली असून, त्यामध्ये नेता निवडीबाबत निर्णय होणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र सिंह आणि माजी सरचिटणीस दीपक बाबरिया हे काम पाहणार आहेत.
पक्षनेत्याच्या निवडीसाठी निरीक्षक : त्यांनी ट्विट केले की, आदरणीय काँग्रेस अध्यक्षांनी सुशील कुमार शिंदे (माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र), जितेंद्र सिंह (पक्ष सरचिटणीस) आणि दीपक बाबरिया (माजी महासचिव) यांची विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय जनता पक्षाला (भाजप) त्यांच्या एकमेव दक्षिणेकडील बालेकिल्ल्यातून हुसकावून लावत काँग्रेसने शनिवारी कर्नाटकमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. आता आव्हान आहे ते मुख्यमंत्री निवडीबाबत.
'पुढचे मुख्यमंत्री' असे वर्णन : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी.के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी दोघांनीही आपल्या समर्थक आमदारांसोबत बैठक घेतली आहे. समर्थकांनी सिद्धरामय्या (75) आणि शिवकुमार (60) यांच्या निवासस्थानी बॅनर लावले आणि काँग्रेसच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन आणि 'पुढचे मुख्यमंत्री' असे वर्णन केले आहे.
ध्रुवीकरणाच्या राजकारणातून ते प्रेरित आहेत : पक्षाच्या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, काँग्रेसचे सरचिटणीस (संपर्क) जयराम रमेश यांनी रविवारी ट्विट करून आरोप केला की, "कर्नाटकमधील समाजातील सर्व घटकांकडून काँग्रेसच्या बाजूने दिलेला निर्णायक निकाल भाजप पचवू शकत नाही आणि भाजप द्वेष पसरवू इच्छित आहे." काही माध्यम रात्रंदिवस खोट्यावर खोटेपणा पसरवण्याचे काम करत आहे. पंतप्रधानांच्या द्वेषाच्या आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणातून ते प्रेरित आहेत, यात शंका नाही असही ते म्हणाले आहेत.
जनता दल (सेक्युलर) ने 19 जागा जिंकल्या : राज्यातील 224 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 135 जागा जिंकल्या, तर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) 66 आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (सेक्युलर) ने 19 जागा जिंकल्या आहेत.
हेही वाचा : Mallikarjun Kharge: मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले अन् पक्षाने कात टाकली, वाचा ईटीव्हीचा रिपोर्ट