नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेता कपिल सिब्बल यांनी नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसमध्ये कोणीही अध्यक्ष नाही. मात्र, निर्णय कोणीतरी घेत असल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या हायकमांडने काँग्रेस कार्यकारी समितीची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
काँग्रेसचे वरिष्ठ नेता कपिल सिब्बल म्हणाले, की लोक काँग्रेस सोडून जात असल्याने आपल्यावरच प्रश्न उपस्थित होत आहेत. यांचे खास असलेल्या लोकांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. जितीन प्रसाद आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेस सोडून गेले आहेत. त्यांनी परत यावे. कारण, काँग्रेसची विचारसरणी हा देशाचा पाया आहे. त्याच्या आधारावर आपली प्रजासत्ताक व्यवस्था अस्तित्वात आली होती. या व्यवस्थेला काँग्रेस टिकवू शकते.
हेही वाचा-ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा; शिवसेना विधानसभेच्या 22 जागांवर निवडणूक लढविणार- संजय राऊत
काँग्रेस मजबूत झाली तरच विरोधी पक्ष मजबूत होणार
सिब्बल म्हणाले, की आम्ही मागण्या मांडत राहू. सिब्बल म्हणाले की, संसद चालू असताना अनेक मुद्द्यांवर चर्चा होते. विरोधी पक्ष मजबूत असेल तरच प्रश्न उपस्थित केले जातात. काँग्रेस मजबूत झाली तरच विरोधी पक्ष मजबूत होणार आहे. हे घडणार नसेल तर प्रश्न कसे विचारले जाणार आहेत? काँग्रेसचे नुकसान म्हणजे देशाचे नुकसान आहे. कोणताही पक्षाचा कार्यकर्ता हा कोणा विरोधातही असू शकत नाही. आम्हीदेखील काँग्रेसमध्ये आहोत.
पंजाबमधील स्थितीबाबत सिब्बल यांनी दिली प्रतिक्रिया
कपिल सिब्बल म्हणाले, की सीमावर्ती राज्यात (पंजाब) काँग्रेससोबत असे घडत आहे, त्याचा अर्थ काय आहे? त्याचा आयएसआय आणि पाकिस्तानला फायदा आहे. एकजुटीने राहण्यासाठी काँग्रेसने ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे. जर कुणाला अडचण असेल तर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी.
दरम्यान, काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ नेतृत्व असावे, अशी मागणी करणारे पत्र सोनिया गांधी यांना ऑगस्ट 2020 मध्ये लिहिले होते. संबधित पत्रामध्ये गुलाम नबी आझाद यांनी स्वाक्षरी केली होती.
राहुल गांधींनी 'पत्रा'संदर्भात विचारले होते प्रश्न -
राहुल गांधींनी पत्र लिहीण्याच्या वेळे संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. राहुल यांच्या मते हे पत्र राजस्थान किंवा मध्यप्रदेशच्या निवडणुकीवेळी का लिहिण्यात आले नाही?यासोबतच सुरू असलेल्या प्रकारामागे भाजपचा हात असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. राहुल यांच्या मते पत्र लिहिणारे भाजपशी मिळालेले आहेत. यामुळेच सोनिया गांधी रुग्णालयात दाखल असताना अशा प्रकारचे पत्र लिहिण्यात लिहिल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता.