नवी दिल्ली - कार्यकर्त्यांशी संवाद आणि पक्ष सोडून जाणाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या 'जी 23' गटातर्फे काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. आगामी विधानसभा निवडणुका आणि सध्याच्या राजकीय परिस्थिती यावर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीला आता सुरवात झाली आहे.
हेही वाचा - प्रियंका गांधींच्या संघर्षाने दिल्लीही झोपली नसावी, रोखठोक'मधून राऊतांचा भाजपवर हल्ला
२४ अकबर रोड कार्यालयात बैठक
सद्य राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक निवडणुका यावर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यालय 24 अकबर रोड येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे.
पत्र लिहून केली होती मागणी
अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी सीडब्ल्यूसीची बैठक घेण्याची मागणी केली होती. आझाद यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाशी संबंधित बाबींवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची तत्काळ बैठक घेण्याचे आवाहन केले होते.
सिब्बल यांनी उपस्थित केले होते प्रश्न
सिब्बल यांनी पक्षाच्या पंजाब युनिटमधील गोंधळाच्या दरम्यान पक्ष नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले होते आणि म्हटले होते की परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली पाहिजे आणि संघटनात्मक निवडणुका घेण्यात याव्यात.
हेही वाचा - काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली, पण... शिवसेनेचा सहकारी पक्षाला सल्ला
पक्षाध्यक्षांच्या निवडीवर चर्चा?
CWCची बैठक अशा वेळी होणार आहे, जेव्हा सुष्मिता देव, जितिन प्रसादा, लुईझिन्हो फालेरो आणि इतर अनेक नेते गेल्या काही महिन्यांत काँग्रेस सोडून इतर पक्षांमध्ये सामील झाले आहेत. काँग्रेस कार्यकारिणीची बैठकही या अर्थाने महत्त्वाची आहे की, पक्षाध्यक्षांची निवडणूक दीर्घ काळापासून प्रलंबित आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोना महामारीमुळे सभापतीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती, जी आधी जून महिन्यात प्रस्तावित होती.
विधानसभा निवडणुकीवर होणार मंथन
असे मानले जाते की CWCच्या या बैठकीत, काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात तारीख किंवा चौकट निश्चित केली जाऊ शकते. काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे, की या बैठकीत उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीवरही चर्चा केली जाईल. पुढील वर्षांच्या सुरुवातीला या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.