भुवनेश्वर - देशभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ओडिशामधील पिपिलि पोटनिवडणुकीमधील काँग्रेस उमदेवार अजित मंगराज यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले. भुवनेश्वरमधील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अपोलो रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी राकेश राय यांनीही माहिती दिली. मंगराज यांनी 10 एप्रिलला कोरोनाची लागण झाल्याचे फेसबूक पोस्टद्वारे सांगितले होते.
पिपिलि विधानसभा मतदारसंघात 17 एप्रिलला मतदान होणार आहे. मात्र, अजित मंगराज यांच्या निधनानंतर निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान यासंदर्भात अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाने जारी केलेली नाही. भाजपा आमदार प्रदीप महारथी यांचे निधन झाल्याने पिपिली मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येत आहेत. अजित मंगराज यांच्या मृत्यूवर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि राज्यपाल गणेशी लाल यांनी शोक व्यक्त केला.
तामिळनाडूत काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू -
तामिळनाडूमधील काँग्रेसचे उमेदवार पीएसडब्ल्यू माधव राव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांनी श्रीविलिपुथुर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर ते आजारी पडले होते. तसेच त्यांच्या फुफ्फुसातही इन्फेक्शन झालं होतं. श्रीविलिपुथुर मतदारसंघातून माधव राव यांचा विजय झाल्यास पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. जर त्यांचा पराभव झाला. तर निवडणूक घेण्यात येणार नाही. तामिळनाडूतील 234 विधानसभेच्या जागांसाठी सहा एप्रिलला मतदान झालं. इथे केवळ एकाच टप्प्यात मतदान पार पडलं.
हेही वाचा - मोदी आणि ममता बॅनर्जी एकाच नाण्याच्या दोन बाजू; असदुद्दीन ओवैसी यांचा हल्लाबोल