श्रीनगर : एखाद्या ध्येयाने झापाटल्यावर ते पुर्ण करण्यासाठी माणूस सर्व शक्ती पणाला लावतो. त्याला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा समोर ठळक दिसते ते आपले ध्येय. तो झपाटल्यासारखे त्यामगे धावत असतो. आज देशातच नाही तर जगभरात ज्या गोष्टीची चर्चा झाली ती गोष्ट म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी काढलेली आणि आता पुर्ण केलेली भारत जोडो यात्रा. या ऐतिहासीक यात्रेचा आज काश्मिरमध्ये समारोप झाला. मात्र, ही यात्रा जेव्हा निघाली तेव्हापासून जर पाहिले तर लोक फक्त प्रेमाला, आपुलकीला, मायेला, आधाराला आणि आपलेपणाला किंमत देतात हे दिसून येते आणि तेच या यात्रेच्या माध्यमातून समोर आले आहे. आज यात्रेच्या समारोपाला राहुल यांनी जे भाषण केले ते कमालीचे भावनिक आणि कमालीचे आपलेपण सांगणाहे होते...
टीशर्ट लाल करण्याची संधी दिली होती : मी भारत जोडो यात्रा सुरु केली तेव्हा मला सांगण्यात आले की तुम्ही शेवटचे चार दिवस म्हणजेच जम्मू काश्मीरमध्ये जाल तेव्हा कारने फिरा. तुम्हाला कारणे फिरणेच योग्य ठरेल. तिकडे पायी फिरू नका. कारण तुमच्यावर ग्रेनेड हल्ला होऊ शकतो. मात्र, मला काश्मीरमध्ये ग्रेनेड नाही मिळाला तर मला काश्मिरी लोकांनी आनंदाश्रूंनी माझे स्वागत केले आहे. काश्मीरवासीयांचे प्रेम मला मिळाले आहे. दरम्यान, मी असाही विचार केला की या निमित्ताने आपण विरोधकांना माझा पांढरा टीशर्ट लाल करण्याची संधी द्यावी. ती मी दिली होती. मात्र असे काहीही घडले नाही असेही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.
मी आपल्या घरातल्या लोकांसोबतच चाललो : मला हे सांगण्यात आले की तुम्हाला भारत जोडो यात्रेत शेवटचे चार दिवस कारने जायला हवे. जर तुम्ही पायी चाललात तर तुमच्यावर ग्रेनेड हल्ला होऊ शकतो. त्यावेळी विचार केला की मी आपल्या घरातल्या लोकांसोबतच चालणार आहे. मला काय होणार आहे. जे माझा तिरस्कार करतात त्यांना मी एक संधी देतो. माझ्या पांढऱ्या शर्टाचा रंग बदलावा. मला महात्मा गांधींची शिकवण आहे की जगायचे तर न घाबरता जगायचे आहे. मी चार दिवस दिले होते की माझा टी शर्ट रंगवायाचा असेल, तर लाल रंगात रंगवा. मला जम्मूच्या लोकांनी ग्रेनेड हल्ला नाही दिला तर मला भरभरून प्रेम दिले. मी आता जम्मू काश्मीरच्या लोकांना सांगू इच्छितो की तुमचे दुःख दूर करण्यासाठी मी प्रयत्न करेन अशी प्रेमाची सादही राहुल यांनी यावेळी घातली आहे.
मला जी बाब सोपी वाटली होती ती माझ्यासाठी कठीण झाली : खरे सांगायचे तर तु्म्हाला अजब वाटेल पण मी गेली अनेक वर्षे दररोज आठ दहा किमी धावतो. देश आपल्याला कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालणे सोपे असेल असे वाटले होते. मला वाटले होते की हे फार कठीण नाही. मी बराचसा व्यायाम करत होतो त्यामुळे थोडा गर्व मला झाला होता. तसे होणे अगदी स्वाभाविकही आहे पण नंतर गोष्टी बदलल्या. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी फुटबॉल खेळत असे. एकदा कॉलेजमध्ये फुटबॉल खेळत असताना मला दुखापत झाली होती. मी ही गोष्ट विसरून गेलो होतो कारण नंतर गुडघा दुखणं बंद झाले होते. मात्र, कन्याकुमारीपासून चालू लागलो त्यानंतर पाच दिवसांनी गुडघा ठणकू लागला. माझा सगळा गर्व त्याच क्षणी संपला असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मला जी बाब सोपी वाटली होती ती माझ्यासाठी कठीण झाली. मात्र हे मी नंतर करून दाखवले.
त्या सेकंदात माझ्या वेदना त्या क्षणी गायब झाल्या : मला या भारत जोडो यात्रेने खूप काही शिकवले आहे. अनेकदा मला वेदना व्हायच्या पण मी त्या सहन करायचो. एकदा रस्त्यात मला खूप वेदना होऊ लागल्या. त्यानंतर सहा-सात तास चालायचे होते. त्यावेळी मला वाटले आज मला पुढे जाता येणे कठीण आहे. त्यावेळी माझ्याकडे एक लहानगी मुलगी धावत आली. तिने मला लिहिलेल्या काही ओळी दिल्या. मला तिने सांगितले की या ओळी तुमच्याचसाठी आहेत पण आत्ता वाचू नका नंतर वाचा. मी नंतर त्या ओळी वाचल्या तेव्हा त्यात त्या मुलीने लिहिले होते की मला हे दिसते आहे तुमच्या गुडघ्यामध्ये दुखापत झाली आहे. कारण तुमच्या चेहऱ्यावर त्या वेदना दिसतात. मी तुमच्यासोबत पुढे येऊ शकत नाही. पण मला माहित आहे की तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या भविष्यासाठी चालत आहात असे तिने लिहिले होते. त्या सेकंदात माझ्या वेदना त्या क्षणी गायब झाल्या असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
लहान मुले आपल्यापेक्षा खूप चांगली आणि निर्मळ : मी जेव्हा चालत होतो त्याचवेळी थंडी वाढत होती. त्यावेळी चार लहान मुले आली. ही लहान मुले भीक मागत होती. त्यांच्याकडे कपडेही नव्हते. मी पाहिले ती मुले बहुदा मजुरीही करत असावीत. मी त्यांना भेटलो, त्यांची गळाभेट घेतली. त्यासाठी मी गुडघ्यांवर बसलो होतो. त्यावेळी मला कळले की ती मुले थंडीने आणि भुकेने व्याकूळ झाली होती. मी विचार केला की आता जर ही मुले स्वेटर्स नाही घालत, त्यांच्याकडे जॅकेट नाही तर आपणही ते घालायला नको. आज मला हे सगळे सांगायला संकोच वाटतो आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मी जेव्हा त्या मुलांना भेटलो तेव्हा एकाने मला कानात सांगितले की लहान मुले अस्वच्छ आहेत त्यांच्याजवळ जाऊ नका. त्यावेळी मी पटकन त्यांना सांगितलं की ही लहान मुले आपल्यापेक्षा खूप चांगली आणि निर्मळ आहेत.
दोन प्रकारच्या विचारधारा आहेत : मी जेव्हा काश्मीरच्या दिशेने येत होतो तेव्हा मी विचार करत होतो की याच रस्त्याने मी खालून वर चाललो होतो. त्यावेळी याच रस्त्याने अनेक वर्षांपूर्वी माझे नातेवाईक वरून खाली आले. अलहाबादला जाऊन स्थायिक झाले. मी जेव्हा काश्मीरच्या दिशेने जात होतो तेव्हा मी आपल्या घरीच चाललो आहे असं मला वाटलं असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आपल्याकडे दोन प्रकारच्या विचारधारा आहेत. या दोघींमध्ये एक नातं आहे. महात्मा गांधी वैष्णव जन तो हा मंत्र देऊन गेले आहेत. मी माझं कुटुंब सोबतच आहे असं समजूनच मी इथे आलो. माझ्या कुटुंबाने छोटंसच काम केलं होतं.
भाजपाचा एकही नेता अशा प्रकारे चालू शकत नाही : मी हिंसा पाहिली आहे, सहन केली आहे. ज्याने हे पाहिलेलं नाही त्यांना हे कळणार नाही. मोदी, अमित शाह, आरएसएस चे लोक यांनी हिंसा पाहिलेली नाही. ते घाबरतात. मी चार दिवस पायी चाललो मात्र मी तुम्हाला खात्रीने सांगतो की भाजपाचा एकही नेता अशा प्रकारे चालू शकत नाही. कारण त्यांना भीती वाटते. दरम्यान, आज तुम्ही बर्फात उभे आहात पण तुमच्यापैकी कुणालाही थंडी वाजत नाही. सगळे पावसात उभे होते पण कुणी भिजलं नाही. थंडी असूनही तुम्हाला थंडी वाजत नाहीये कारण देशाची शक्ती तुमच्यासोबत आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. प्रियंकाचं भाषण ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण मी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली होती. संपूर्ण देशात आम्ही पायी चाललो.
आजीला गोळ्या मारल्या, आजीला गोळ्या मारल्या : मी सामान्य नागरिक, लष्कर, बीएसएफ सगळ्यांना सांगू इच्छितो. मी १४ वर्षांचा होतो. भुगोलाचा तास सुरु होता. त्यावेळी एक शिक्षिका आल्या. त्यावेळी मला त्यांनी सांगितलं की मुख्याध्यापकांनी तुला बोलावलं आहे. मी खोडकर होतो. खूपच खोडकर होतो. तुम्ही प्रियंकालाही विचारू शकता. मला वाटलं आता शिक्षा करण्यासाठी मला बोलावलं गेलं आहे. मात्र मला माझ्या ज्या शिक्षिकेने निरोप दिला त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळेच भाव होते. मी मुख्याध्यापकांच्या दालनाकडे जाऊ लागलो. त्यांच्या कार्यालयात गेलो तेव्हा मला मुख्याध्यापकांनी सांगितलं की राहुल तुझ्या घरून फोन आला आहे. त्यावेळी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. माझं मन मला सांगू लागलं की काहीतरी वाईट घडलं आहे. माझे पाय कापू लागले. मी फोन कानाला लावला तेव्हा माझ्या आईसोबत काम करणारी एक बाई ओरडून सांगत होती, आजीला गोळ्या मारल्या, आजीला गोळ्या मारल्या हे सांगत होती.
मी हिंसा पाहिली आहे : मी त्यावेळी १४ वर्षांचा होतो. जे आत्ता तुम्हाला मी सांगतोय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, डोवल यांना कळणार नाही. मात्र काश्मीरच्या लोकांना मी काय म्हणतोय ते समजेल. मला त्या बाईने फोनवर सांगितलं की तुझ्या आजीवर गोळ्या झाडल्या. मला कारमधून घरी नेण्यात आलं. त्यावेळी मी ती जागा पाहिली जिथे माझ्या आजीचं रक्त सांडलं होतं. त्यानंतर वडील आले, आई आली. आईच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. तर तुम्हाला हेच सांगू इच्छितो की मी हिंसा पाहिली आहे.
बाबा आता आपल्यात नाहीत : आमचा मोबाइलकडे पाहण्याचाही दृष्टीकोन वेगळा आहे. हा आमच्यासाठी फक्त टेलिफोन नाही. या घटनेनंतर सहा-सात वर्षांनी आणखी एक घटना घडली. २१ मे चा दिवस होता. पुलवामामध्ये आपले सैनिक मारले गेले तिथे फोन आला असेल. काश्मिरींच्या घरी फोन आले असतील. त्यावेळी मला फोन आला तो माझ्या बाबांच्या मित्राचा होता. त्यांनी मला फोनवर सांगितलं राहुल वाईट बातमी आहे. मी त्यांना म्हटलं हो मला समजलं आहे की बाबा आता आपल्यात नाहीत. त्यावर ते हो म्हणाले मी त्यांना थँक्स म्हटलं आणि फोन ठेवला. जो हिंसाचार घडवतो जसं मोदी आहेत, अमित शाह आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे किंवा अजित डोवल असतील ते या वेदना काय असतात? हे समजू शकणार नाहीत. पुलवामाच्या शहीद सैनिकांच्या मुलांच्या मनात काय वेदना झाल्या असतील तेव्हा काय वाटलं असेल ते मी समजू शकतो माझी बहिण समजू शकते.
विचारधारेची शिकवण टीकावी : मला एका पत्रकाराने विचारलं भारत जोडो यात्रेने काय साधलं? काश्मीरमध्ये येऊन काय साध्य केलं. मी त्याचं उत्तर दिलं नाही. मी आज हे उत्तर देतो आहे की अशा प्रकारचे फोन कॉल येणं त्या वेदना त्या मुलांना, आईला न होणं हे बंद झालं पाहिजे असं माझं लक्ष्य आहे. भाजपा आणि संघाचे लोक मला शिव्या देतात. पण मी त्यांचे आभार मानतो. कारण मला ते जेवढ्या शिव्या देतील त्यातून मी शिकत जातो. मात्र मी जे तुम्हाला सांगितलं ते काश्मिरी लोकांसाठी असेल, भारतीयांसाठी असेल, महात्मा फुलेंचा विचार असेल किंवा इतर समाजसुधारकांचा विचार असेल त्यांनी एक विचारधारा मांडली आहे.
विचारधारा नाही तर ती सगळ्यांच्या मनातून काढायची आहे : त्या विचारधारेची शिकवण टीकावी म्हणून मी भारत जोडो यात्रा काढली आहे. मी ही भारत जोडो यात्रा काँग्रेस पक्षासाठी नाही काढली तर माझ्या भारताच्या जनतेसाठी काढली आहे. जी विचारधारा देशाचा पाया मोडण्याचा प्रयत्न करते आहे त्याविरोधात आपण उभे राहिले पाहिजे. तिरस्काराने नाही तर प्रेमाने आपण या विरोधात उभे राहिले पाहिजे. जर आपण प्रेमाने उभे राहिलो तर आम्हाला यश मिळेल हे आम्हाला माहित होतं. आपल्याला हा विचारधारा फक्त संपवायची नाही ती सगळ्यांच्या मनातून काढायची आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दुफान बर्फ कोसळत असताना लोकांना संबोधित केले : भाजपाने आपल्याला जगण्याची एक पद्धत दाखवली आहे. मात्र भारत हा प्रेम, आपुलकी, बंधुभाव पसरवणारा देश आहे त्यादृष्टीने भारत जोडो यात्रा काढून आम्ही नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलने आये थे. आम्ही त्याच दृष्टीने एक प्रयत्न केला. असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी उपस्थित होते. दरम्यान, राहुल यांनी यावेळी दुफान बर्फ कोसळत असताना लोकांना संबोधित केले. त्यावेळी लोकांनीही त्यांंना मोठा प्रतिसाद देत निरोप दिला.
हेही वाचा : मेलो तरी बेहत्तर पण भाजपसोबत युती करणार नाही, नितीश कुमारांचा पलटवार