नवी दिल्ली - भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे त्यांच्या रोकठोक मतांसाठी ओळखले जातात. अनेकदा स्वामींची भूमिका ही पक्षाच्या भूमिकेपेक्षा बरीच वेगळी असली तरी ते उघडपणे आपली मतं मांडताना दिसतात. जम्मू काश्मीर, 2024 लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, आदी मुद्यांवर ईटीव्ही भारतच्या ज्येष्ठ वार्ताहर अनामिका रत्न यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्याशी चर्चा केली आहे.
भाजपा नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी चीनवरील सरकारच्या कारवाईवर समाधानी नाहीत. चीनला भारतीय सीमेच्या आत का येऊ दिले. चीनला धडा शिकवायला हवा होता, असे ते म्हणाले. तसेच अमेरिकेच्या दबावाखाली पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरच्या नेत्यांची बैठक घेतल्याचा दावाही त्यांनी केला. याचबरोबर
2024 मध्ये पुन्हा एकदा भाजपाचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 75 वर्षापेक्षा जास्त लोकांनी निवडणुकीत संन्यास घ्यावा असे मोदी म्हणाले होते. तर 2024 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असेल, हे मोदींनी जाहीर करावे. कारण, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांना पूर्वीच बाजूला केले आहे, असे सुब्रमण्यम यांनी म्हटलं.
सुब्रमण्यम स्वामी यांच्याशी झालेल्या संभाषणाचे काही भाग -
- प्रश्न- आणीबाणीवर तुमचे काय मत आहे.
उत्तर - तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या आणीबाणीचे कारण होत्या. कारण अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्यावर 6 वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी त्याला वेळ लागला. त्या काळात जयप्रकश नारायण यांच्या चळवळीला वेग आला होता. तेव्हा त्यांनी आणीबाणी लागू केली. या दरम्यान सुमारे 1.40 लाख लोकांना तुरूंगात टाकले गेले. तर बरेच लोक भूमिगत झाले. मीही त्यांच्यात सामील होतो. त्यावेळी मी वेश बदलून दिल्लीवरून मुंबईला पोहचलो. तेथून अमेरिकेत गेलो.
- प्रश्न - इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी एक चूक होती, असे विरोधी पक्षांनी मान्य केले आहे. मात्र, आजही आपत्कालीन परिस्थिती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
उत्तर- आपत्कालीन परिस्थिती नाही. आपण मुक्तपणे फिरू शकतो. कोणीही आपल्याला तुरूंगात टाकणार नाही. त्यावेळी कोणतेही हक्क बाकी नव्हते. मी भाजपामध्ये आहे आणि मला कोणतेही धोरण आवडत नसेल. तर मी त्यावर टीका करतो. पण काँग्रेसमध्ये आजही कोणी हे करू शकत नाही. आजची परिस्थितीची आणीबाणी काळाशी तुलना करणे चुकीचे आहे.
- प्रश्न- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मिरी नेत्यांसोबत बैठक घेतली. काश्मीरमधील नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. आपत्कालीन परिस्थितीसारखी निर्माण झाली होती, असे विरोधी पक्षाने म्हटलं. यावर तुम्ही काय सांगाल.
उत्तर - तसे नाही, नेत्यांना कोर्टात जाण्याचा अधिकार होता आणि काही नेतेही गेले. काश्मीर हा आपला अविभाज्य भाग आहे. आपली बरीच पवित्र तिर्थस्थाने तेथे आहेत. धर्मांतर करून काश्मीर खोऱ्यात मुस्लिम बहुल क्षेत्र तयार केले गेले. जम्मू अजूनही हिंदू बहुसंख्य आहे आणि लडाख बौद्ध बहुसंख्य आहे. जेव्हा आपल्या घटनेत अनुच्छेद 370 आणले गेले. तेव्हा त्यास बराच विरोध झाला होता. कलम 370 काही काळ असेल असे सरदार पटेल म्हणाले होते. आता 70 वर्षांनंतर आपण केलेले आश्वासन पूर्ण केले. काश्मीरपासून काश्मिरी पंडितांना, शीखांना पळवून लावलं. पंतप्रधानांनी ही बैठक घ्यायला नको होती. मात्र, अमेरिकेतून दबाव होता.
- प्रश्न- काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्याची मागणी करून काँग्रेस पुन्हा चूक करत आहे का?
उत्तर- काँग्रेस आत्महत्या करण्याच्या स्थितीत आहे, म्हणून ते असे बोलत आहेत. त्यांनी आतापर्यंत चीनचा निषेध केला नाही. चीनने भारताच्या हद्दीत पाय ठेवला नाही, असे मोदी सरकारने म्हटलं. आपल्या भूमीवर कब्जा करून चीनने चूक केली. चीनविरोधात सरकारने जी भूमिका घेतली. ती चुकीची होती. मी सरकारच्या भूमिकेवर समाधानी नाही. चर्चेऐवजी चीनला पळवून लावायला हवे होते. 1962 ची पुनरावृती होणार नाही, हे दाखवून द्यायला हवे होते.
- प्रश्न - उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार आहे. भाजपा सरकारच्या काळात बर्याच लोकांचे धर्मांतर झाले. यामध्ये राज्य सरकारचे दुर्लक्ष होते.
उत्तर- धर्मांतर जर ऐच्छिक असेल तर कोणीही त्याला रोखू शकत नाही. हिंदूंची आर्थिक परिस्थिती मुस्लिमांच्या तुलनेत चांगली आहे. त्यामुळे लोकसंख्याही कमी होत आहे. मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा वेगाने वाढत आहे. यात मुस्लिम जबाबदार नाही, तर त्यांची आर्थिक परिस्थिती जबाबदार आहे. केरळमधील हिंदू आणि यूपीच्या हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये फरक आहे. यूपीमध्ये तीन ते चार मुलं जोडपे जन्माला घालते. तर केरळमध्ये कमी मुले जन्माला येतात. कारण त्यांच्याकडे शिक्षणाचा दर्जा उत्तम आहे.
- प्रश्न- दोन अपत्ये जन्माला घालावीत हा कायदा भारतात आला पाहिजे?
उत्तर- कायद्याने काहीही होणार नाही. एवढ्या मोठ्या देशात मुलांचा हिशोब कोण ठेवेल? लोकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. उत्तम शाळा बांधाव्या लागतील. शिक्षणाचे प्रमाण वाढवावे लागेल. आम्ही जीडीपीच्या केवळ 1.5 टक्के शिक्षणावर खर्च करतो. तर विकसित देश 6 टक्क्यांपेक्षा कमी खर्च करत नाहीत.
- प्रश्न- देशातील कोरोना परिस्थितीला सरकारचे चुकीचे व्यवस्थापन जबाबदार आहे का?
उत्तर- कोरोनाचा फटका प्रत्येक घटकाला बसला आहे. पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळवल्यानंतर आपण दुसऱ्या लाटेला हलक्यात घेतले. आता तीसरी लाट येईल म्हणून आपण घाबरलो आहोत.
- प्रश्न - लस इतर देशांना पाठवल्यामुळे देशात तुटवडा निर्माण झाला. यावरून विरोधी पक्षाने केंद्राला लक्ष्य केले.
उत्तर- टीका करणे खूप सोपे आहे. गरज होती. तेव्हा कोणी बोलले नाही. सरकारने लसीसाठी उत्पादकांना पैसे द्यायला हवे होते.
- प्रश्न - 2022 मध्ये 5 राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. विरोधी पक्ष पंतप्रधान मोदींच्या विरोधात एकत्र येत आहेत. देशात भाजपाविरोधी वातावरण करण्यासाठी तयारी चालू आहे. याचा पंतप्रधान मोदी किंवा सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होईल का?
उत्तर - 2024 लोकसभा निवडणुकांसाठी मोदींनी सर्वप्रथम पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल हे घोषित करावे. कारण, 75 वर्षापेक्षा जास्त लोकांनी निवडणुकीत संन्यास घ्यावा असे मोदी म्हणाले होते. तर 2024 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असेल, हे मोदींनी जाहीर करावे. मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांना वयाचा दाखला देत पूर्वीच बाजूला केले आहे. हेच मोदींना लागू होईल की नाही? यावर त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी.
- प्रश्न - 2024 मध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल? किंवा काँग्रेस किंवा तिसरी आघाडी उदयास येईल का?
उत्तर - 2024 पर्यंत काहीही होऊ शकते. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी तुरुंगात गेले तर काय होईल. आतापर्यंत पाहण्याची गरज नाही परंतु कार्यकर्त्यांमध्ये जोश हवा.
- प्रश्न - बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला का?
उत्तर - नक्कीच झाला आहे. आम्ही इतर पक्षांसह गर्दी केली ज्याचा परिणाम कामगारांवर झाला. टीएमसीतून 146 नेते भाजपात आले. आता ते पुन्हा परत जात आहेत. कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष केल्यास आपण जिंकू शकणार नाही. परंतु हे सर्व बदलेल आणि 2024 मध्ये आपले भाजपाचेच सरकार स्थापन होईल.
- प्रश्न - राम मंदिरात जमीन घोटाळा झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर तुमचे काय मत आहे?
उत्तर- मी याकडेही लक्ष दिले नाही. मी काम कसे चालू आहे, ते पाहत आहे. चंपत राय यांच्यावर हे आरोप केले जात आहेत. ते एक संत व्यक्ती आहेत. ते सर्व काही सोडून एक स्वयंसेवक झाले. त्याच्यावर आरोप करणे हा एक अन्याय आहे. या सर्व प्रकरणात मोदींनी लक्ष घालायला हवे. खटला न्यायालयात जिंकल्यानंतर नरेंद्र मोदींनी सर्व काही आपल्या हातात घेतले. मला तर शिलान्यास सोहळ्यास उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. मला आमंत्रण मिळाले नाही. मंदिर बांधल्यानंतर मी भेट देईन. राम मंदिर बांधावे, अशी माझी इच्छा आहे.