इंदूर - कॉमेडियन मुनव्वर फारूकीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला असून त्याची शनिवारी रात्री 12 वाजता तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर तो मुंबईकडे रवाना झाला. सुटकेनंतर त्याने एक व्हिडिओ जारी केला असून आपल्याला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे, असं म्हटलं. मुनव्वर फारूकीवर हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप होता. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन दिला. मुनव्वर फारुकीची जामीन याचिका हायकोर्ट आणि इंदूर जिल्हा कोर्टाने फेटाळली होती. त्यानंतर मुनव्वरने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
संपूर्ण प्रकरण हे अद्याप न्यायालयात विचारधीन आहे. यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही. मात्र, मला न्यायालय आणि कायदा व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. मला एक दिवस न्याय मिळेल, असं मुनव्वर फारुकीने व्हिडिओमध्ये म्हटलं. तथापि, सर्वोच्च न्यायालयात मुनव्वर फारुकीने दोन अर्ज दाखले केले होते. एका अर्जात जामीन मिळण्यासाठी तर दुसऱ्यात अर्जात त्याने वेगवेगळ्या राज्यात त्याच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारींना एका ठिकाणी हस्तांतरीत करण्याची मागणी केली.
काय प्रकरण ?
इंदूरच्या तुकोगंज परिसरातील एका कॅफेमध्ये 1 जानेवरीला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विनोदी कलाकार मुनव्वर फारूकीने हिंदू देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांवर आक्षेपार्ह विनोद केले होते. त्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर हिंदु रक्षा संघटनेच्या एकलव्य गौर आणि कार्यक्रमात उपस्थित अनेक कार्यकर्त्यांनी मुनव्वर फारुकीला पोलिसांच्या स्वाधीन केले होते.