तेजपूर (अरुणाचल प्रदेश): अरुणाचल प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (APPSC) पेपर लीक प्रकरणी अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आंदोलनांनी पेटले आहे. आंदोलक सीबीआय चौकशीवर समाधानी नाहीत आणि त्यांच्याकडून 13 कलमी अजेंडाची मागणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री पेमा खांडू आणि राज्याचे गृहमंत्री बामंग फेलिक्स यांनी शनिवारी दुपारी 2 ते 8 या वेळेत PAJSC अधिकार्यांसोबत बंद खोलीची बैठक घेतली. या बैठकीत काय निर्णय झाला, याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.
आंदोलकांनी बैठकीचे निमंत्रण नाकारले: तत्पूर्वी मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी आंदोलकांना त्यांच्या कार्यालयात चर्चेसाठी बोलावले होते. इटानगरचे प्रभारी आयुक्त सचिन राणा यांनी आंदोलकांना निमंत्रण दिले होते, मात्र त्यांनी बैठक नाकारली. मात्र, शनिवारी तासभर चर्चेनंतर सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. सरकारने काही अटींसह मागण्या मान्य केल्याचे सीएमओ कार्यालयाने सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात बंदची हाक: आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी आधी १२ तासांचा बंद पुकारला होता, मात्र नंतर हा बंद २१ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. राजधानी इटानगरमध्ये शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बंद दरम्यान, हजारो आंदोलकांनी कडक बंदोबस्तात इटानगरमध्ये शांततेत घोषणाबाजी केली. आंदोलक विद्यार्थ्यांनी रॅली काढली, त्यादरम्यान आंदोलकांनी 'अरुणाचल वाचवा', 'आमच्या मागण्या पूर्ण करा'च्या घोषणा दिल्या.
जनजीवन झाले विस्कळीत: सर्व केंद्र सरकारी आणि खाजगी कार्यालये, शैक्षणिक संस्था, दुकाने आणि बाजारपेठा शनिवारी बंद होत्या. तथापि, काही राज्य सरकारी कार्यालये शून्य उपस्थिती आणि रस्त्यावर कडक सुरक्षा व्यवस्थेसह उघडी राहिली. नाहरलोगन आणि इटानगरमध्ये सकाळी सर्व प्रकारची व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. राज्य परिवहन अधीक्षक, इटानगरच्या म्हणण्यानुसार, राज्य परिवहन विभागाने कार्यालयात जाणाऱ्यांना नेण्यासाठी सकाळी पोलिस बंदोबस्तात काही बसेस चालवल्या.
शुक्रवारी झाला हिंसाचार: अरुणाचल प्रदेश लोकसेवा आयोग (APPSC) पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी अरुणाचल प्रदेशमध्ये हिंसाचार झाला. 4 सुरक्षा अधिकाऱ्यांसह किमान 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. पॅन अरुणाचल संयुक्त सुकाणू समितीने (PAJSC) पेपर लीकच्या मुद्द्यावरून शुक्रवारी अनिश्चित काळासाठी बंद पुकारला होता. हिंसाचारानंतर अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने APPSC चे नवनियुक्त अध्यक्ष संतनु दयाल यांचा शपथविधी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेना खांडू यांनी संध्याकाळी सीएमओकडून एक निवेदन जारी केले की, लोकांच्या भावनांचा आदर करून राज्य सरकारने अरुणाचल प्रदेश लोकसेवा आयोग (APPSC) चे नामनिर्देशित अध्यक्ष आणि सदस्यांचा नियोजित शपथविधी सोहळा रद्द केला.