पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे किसान समागम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार 4 हजार 700 शेतकऱ्यांशी संवाद साधला. हा संवाद चौथ्या कृषी रोड मॅपला अंतिम स्वरुप देण्यासाठी केला गेला. या शेतकऱ्यांमध्ये बाहेरून शेतीचे शिक्षण घेऊन आलेलेही काही लोक होते, ज्यांनी कार्यक्रमात आपली मते आणि सूचना मांडल्या. त्यावेळी लॉकडाऊनच्या काळात बिहारमध्ये परतलेला एक शेतकरी या कार्यक्रमात बोलत होता. आपल्या भाषणादरम्यान शेतकऱ्याने काही इंग्रजी शब्द अनेकवेळा वापरले. बराच वेळ त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार संतापले आणि त्यांनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली.
इंग्रजी बोलल्याने नितीश संतापले : मुख्यमंत्री म्हणाले की जगात इंग्रजी ही एकच भाषा नाही. ज्यांनी आपल्या देशावर राज्य केले त्यांची भाषा आपण का बोलतो? हिंदी ही आपली भाषा आहे. आमचे लोक याच भाषेत बोलतात. या आधी आपल्या भाषणात आणखी एका शेतकऱ्याने मोफत वीज देण्याऐवजी फ्री वीज देण्याचे बोलले, तेव्हा फ्री या शब्दावर नितीश कुमार संतापले आणि म्हणाले की, मुफ्त बोला. नितीश कुमार म्हणाले की, मी सुद्धा इंग्लिश मिडीयममध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. पण देशात जिथे जिथे मी जातो, मी तेथली स्थानिक भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो. बिहारमध्ये जिथे जातो तिथे मी हिंदीतच संवाद साधतो.
सामान्य माणसाला इंग्रजी समजेल का? : नितीश कुमार पुढे म्हणाले, 'मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. हे काय आहे? हे बिहार आहे ना? तुम्ही येथे येऊन फक्त इंग्रजी बोलत आहात. सामान्य माणसाला तुमचे इंग्रजी काय समजेल? तुम्ही शेती करता ना? मग शेतीबद्दल आपल्या बोलचालीच्या भाषेत बोलायला हवे की नको? कोरोना आल्यापासून मी पाहत आहे की लोक मोबाईलवर नव्या नव्या गोष्ट शिकत आहेत. मात्र त्यामुळे ते आपली जुनी भाषा विसरत आहेत. म्हणूनच जर नीट बोला'.
अधिकाऱ्यांनाही फटकारले : यावेळी नितीश कुमार यांनी अधिकाऱ्यांनाही फटकारले. ते म्हणाले की भाषणात हिंदी आणि इंग्रजीची सरमिसळ होत आहे. इंग्रजी बोलायचे असेल तर इंग्रजी बोला, हिंदी बोलायचे असेल तर हिंदी बोला. किंबहुना आगामी काळात शेतकरी इतका बळकट व्हावा, की बिहारचे पदार्थ प्रत्येक भारतीयाच्या ताटात पोहोचतील, असा सरकारचा प्रयत्न आहे. सन 2008 पासून आतापर्यंत पहिला, दुसरा आणि तिसरा कृषी रोड मॅपच्या माध्यमातून या दिशेने प्रयत्न सुरू असून आता चौथा रोड मॅप तयार करण्यात येत आहे.
हेही वाचा : Singer Neha Singh Rathore : 'यूपी में का बा' गाण्याची गायिका नेहा सिंह राठौरला पोलिसांची नोटीस