बीजिंग/नवी दिल्ली - भारताबरोबर सीमारेषेवरून वाद उकरून काढणाऱ्या चीनने आणखी आगळीक केली आहे. देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अरुणाचल प्रदेशला दौरा केल्यानंतर चीनने आक्षेप नोंदविला आहे.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी 9 ऑक्टोबरला अरुणाचल प्रदेशचा दौरा केला. यावेळी त्यांनी अरुणाचल प्रदेशच्या विधीमंडळात सदस्यांना संबोधित केले. त्यावेळी उपराष्ट्रपती म्हणाले, की ईशान्य भारतामध्ये परिवर्तन दिसू लागले आहे. अनेक दशके विकासापासून दूर राहिला आहे. या प्रदेशाचा विकास होऊ लागला आहे.
हेही वाचा-महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती - राजनाथ सिंह
दौऱ्याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की चीनने कधीच अरुणाचल प्रदेशला राज्य म्हणून मान्यता दिली नाही. सीमारेषेबाबत चीनची भूमिका सातत्यपूर्ण आणि स्पष्ट राहिली आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताकडून बेकायदेशीर घेण्यात आला आहे. भारतीय नेते त्या भागाला भेट देत असल्याने त्याला ठामपणे विरोध करत आहोत. चीनला वाटणाऱ्या प्रमुख चिंतेबाबत भारताने आदर करावा, अशी विनंती आहे. गुंतांगुत होईल, अशी कोणतीही कृती करू नका. द्विपक्षीय संबंध आणि विश्वास टिकवावा, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. चीन-भारतामधील सीमारेषेच्या भागात शांतता आणि स्थैर्य टिकविण्यासाठी ठोस कृती करावी. त्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध रुळावर येतील.
हेही वाचा-VIDEO काँग्रेसवर लाजिरवाणा प्रसंग; पत्रकार परिषदेपूर्वी दोन नेत्यांमध्ये टक्केवारीची कुजबूज
अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग
दरम्यान, पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबारेषेचा प्रश्न सोडवावा, अशी भारताची आजवर भूमिका राहिली आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि कायमस्वरुपी भाग राहिला आहे. भारताचे नेते देशाच्या इतर भागांप्रमाणे वेळोवेळी अरुणाचल प्रदेशला भेट देतात. भारत-चीनमध्ये वादग्रस्त अशी 3,488 किलोमीटरची प्रत्यक्ष ताबारेषा आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनकडून दावा केला जातो.
हेही वाचा-सुरक्षा दलाला मोठे यश! त्रालमधील चकमकीत जैश कमांडरला कंठस्नान
दरम्यान, भारतीय नेत्यांनी अरुणाचल प्रदेशला भेट दिल्यास चीनकडून नेहमीच आक्षेप नोंदविला जातो. सीमारेषेबाबत तोडगा काढण्यासाठी भारत-चीनमध्ये चर्चेच्या 13 फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघाला नाही.