नवी दिल्ली : भारताला घाबरवण्यासाठी चीनने आपल्या पारंपारिक आणि सायबर सैन्याला एकत्रित केले आहे, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (बुधवार) व्यक्त केले. तसेच, भारत सरकारच्या भित्रेपणामुळे भविष्यात आपले मोठे नुकसान होणार आहे, असा इशाराही त्यांनी एका ट्विटमधून दिला.
चीनने भारताची जमीन बळकावली..
एका बातमीचा आधार घेत त्यांनी हे ट्विट केले. एलएसीजवळ देपसांग भागामध्ये चीनने उभारलेल्या अड्ड्यांबाबत या बातमीत माहिती दिली आहे. सॅटेलाईट इमेजेसमधून ही माहिती समोर आल्याचा दावा या बातमीमध्ये करण्यात आला आहे. देपसांगमधील आपली जमीन तर चीनने बळकावलीच आहे, तसेच डीबीओ (दौलेत बेग ओल्डी)लाही चीनकडून धोका आहे. याला प्रत्युत्तर न देता सरकारने घाबरटपणा दाखवल्यामुळे भविष्यात आपले नुकसान होणार आहे अशा आशयाचे ट्विट राहुल यांनी केले.
सीमावादावरुन तणाव कायम..
गेल्यावर्षी मे महिन्यात लडाखच्या सीमेवर चीनी आणि भारतीय सैन्यामध्ये झालेल्या झटापटीपासून या प्रांतात तणाव वाढला आहे. यानंतर दोन्ही बाजूंनी सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले होते. गेल्या महिन्यात झालेल्या लष्करी चर्चांनंतर दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे हटवण्यास सुरुवात केली आहे. सरकार ज्याप्रकारे हा मुद्दा हाताळते आहे, त्यावरुन राहुल गांधी वेळोवेळी टीका करत आहेत.
हेही वाचा : चीनकडे झुकते माप नाही, भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याची नेपाळची इच्छा