धमतरी (छत्तीसगड) : लॉटरीद्वारे श्रीमंत होण्याची कहाणी तुम्ही अनेकदा ऐकली असेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत ज्याने पिकांची लॉटरी जिंकून श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. ही व्यक्ती व्यवसायाने शेतकरी आहे. त्याला श्रीमंत करण्यात टोमॅटोचा मोठा वाटा आहे. बाजारात विकल्या जाणाऱ्या या लाल-लाल टोमॅटोमुळे हा शेतकरी रोज नफा कमावत आहे.
दररोज 600 ते 700 कॅरेट टोमॅटो बाजारात : साधारणपणे शेती करणे हा तोट्याचा व्यवसाय मानला जातो. पीक चांगले आले तरी भाव कमी मिळाला तर रस्त्यावर फेकून द्यावे लागते. पण शेतकरी अरुणकुमार साहू यांनी अशा पद्धतीने टोमॅटोची लागवड केली आहे की या टोमॅटोने त्यांना श्रीमंत केले आहे. अरुण यांनी धमतरी जिल्हा मुख्यालयापासून 70 किमी अंतरावर असलेल्या बिरनपूर गावात टोमॅटोचे पीक लावले आहे. तेथे ते त्यांच्या 150 एकर जमिनीतून दररोज 600 ते 700 कॅरेट टोमॅटो बाजारात आणत आहेत. त्यामुळे त्यांची बक्कळ कमाई होत आहे.
कसे कमावत आहेत नफा : टोमॅटो पिकाला हवामानाचा फटका बसला आहे. मात्र अरुण साहू हे प्रगतीशील शेतकरी आहेत. त्यांनीही इतर शेतकऱ्यांप्रमाणे आपल्या शेतात टोमॅटोची लागवड केली. फरक एवढाच आहे की अरुण यांचे तंत्र इतर शेतकऱ्यांपेक्षा थोडे वेगळे आहे. या तंत्राच्या मदतीने अरुण यांच्या पिकाचे वादळ व गारपिटीने नुकसान झाले नाही. त्यांच्या या तंत्राला 'रूट ग्राफ्टिंग' म्हणतात. अरुणकुमार साहू हे शेतकरी त्यांच्या शेतात वांग्याची कलमे करून टोमॅटोचे बंपर उत्पादन घेत आहेत.
वांग्याच्या कलमांपासून टोमॅटोची लागवड : अरुणकुमार साहू यांनी बिरनपूर गावात रूट ग्राफ्टिंग तंत्राने टोमॅटोची लागवड केली आहे. ही सर्व कलमी रोपे आहेत, ज्यात टोमॅटोचे उत्पादन घेतले जात आहे. पण या रोपांची मुळे वांग्याची आहेत. त्यामुळेच पावसातही टोमॅटो पिकाचे नुकसान झाले नाही. अरुण यांनी ही हायटेक शेती समजून घेण्यासाठी विमल भाई चावडा नावाच्या व्यक्तीचा सल्ला घेतला होता.
पूर्वी पारंपारिक शेतीत तोटा व्हायचा. पण 2007 पासून मी भाजीपाला शेती सुरू केली. त्यानंतर विमल भाईंच्या मार्गदर्शनाखाली हायटेक शेती करायला सुरुवात केली. आता दररोज 600 ते 700 कॅरेट टोमॅटोचे उत्पादन होत आहे. - अजय साहू, टोमॅटो उत्पादक.
वारंवार अपयशानंतर मिळाले यश : अरुण साहू धमतरी जिल्ह्यातील विविध भागात 300 एकरपेक्षा जास्त जमिनीवर शेती करतात. त्यांचे लहाणपणापासूनच शेतकरी होण्याचे स्वप्न होते. त्यामुळेच शिक्षणानंतर ते गावी आले. अरुणने यांनी प्रथम आपल्या वडिलोपार्जित शेतात भात लावला, जो पावसामुळे खराब झाला. तेव्हा शेतकऱ्यांना शासनाकडून धानाला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांनी 105 एकरात हरभरा पीक घेतले. मात्र त्यावर्षी सलग तीन दिवस पाऊस पडल्याने हे पीकही उद्ध्वस्त झाले. त्यानंतर त्यांनी शेतीच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब केला. तेव्हापासून त्यांना शेतीत नफा मिळत आहे. अरुण कुमार यांच्या म्हणण्यानुसार, शेतकर्यांनी भाव न मिळाल्याने त्यांची पिके नष्ट केली. त्यामुळेच आज साठा कमी असल्याने मागणी जास्त आहे आणि भावही.
रूट ग्राफ्टिंग शेती म्हणजे काय? : अरुण यांनी आपल्या शेतात रूट ग्राफ्टिंग पद्धत अवलंबली आहे. ग्राफ्टिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये दोन झाडे जोडून नवीन वनस्पती विकसित केली जाते. हे मूळ वनस्पतीपेक्षा जास्त उत्पादन देते. कलम पद्धतीने तयार केलेल्या वनस्पतीची विशेष गोष्ट म्हणजे त्यामध्ये दोन्ही वनस्पतींचे गुण आणि वैशिष्ट्ये आहेत. अनेक प्रकारची झाडे वाढण्यासाठी ग्रॅफ्टिंग तंत्राचा वापर केला जातो. कलम करून विकसित झालेल्या झाडाचा आकार लहान असू शकतो, परंतु त्याला लवकर फळे येऊ लागतात.
वांग्याच्या मुळापासून टोमॅटोचे उत्पादन : 25 दिवस जुन्या वांग्याच्या रोपावर 18 दिवस जुन्या टोमॅटोच्या मूळाचे ग्राफ्टिंग केले जाते. यामुळे बुरशी, बॅक्टेरियाचा त्रास होत नाही. तसेच पाणी साचलेल्या परिस्थितीतही चांगले उत्पादन देते. या तंत्राने हेक्टरी 60 ते 70 टन टोमॅटोचे उत्पादन घेता येते. हे पीक घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे खराब हवामानातही नुकसान होत नाही. तज्ज्ञांच्या मते, छत्तीसगडमध्ये मार्च महिन्यात कोणीही टोमॅटो लावत नाही. कारण येथील हवामान त्यासाठी अनुकूल नाही. पण शेतकरी अरुण कुमार त्यांच्या शेतातून दररोज 600-700 कॅरेट टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत आणि टोमॅटोपासून बंपर कमाईही करत आहेत.
हेही वाचा :