नवी दिल्ली - इंडिगो एअरलाइन्सला सिंगल-यूज प्लास्टिक वापरल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. इंडिगोने प्रवाशांना कोरोनापासून वाचवण्यासाठी फेस शील्ड, मास्क आणि सॅनिटायझर देताना सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर केल्याची माहिती आहे.
चेन्नई कॉर्पोरेशनने खाजगी एअरलाइन्स कंपनी इंडिगोला सिंगल-यूज प्लास्टिक वापरल्याबद्दल गुरुवारी 25,000 रुपयांचा दंड ठोठावला. चेन्नई कॉर्पोरेशनने जारी केलेल्या सूचनेनुसार, इंडिगो एअरलाइन्स त्यांच्या विमानांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी फेस शील्ड, ट्रिपल लेयर मास्क आणि सॅनिटायझरसाठी सिंगल-यूज प्लास्टिक लिफाफे वापरत होती. तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण विभागाने त्या लिफाफ्यांची चाचणी केली. या प्लास्टिकच्या लिफाफेची जाडी 27 मायक्रॉन होती.
सिंगल यूज प्लास्टिक बंदी -
देशातील प्लास्टिकच्या वाढत्या कचऱ्याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. येत्या 1 जुलै 2022 पासून, कप, प्लेट्स आणि स्ट्रॉजसारख्या सर्व वापरात असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या निर्मिती, विक्री आणि वापरावर देशात बंदी घालण्यात आली आहे. फुगे, आईसक्रीम आणि कँडीसाठी वापरत असलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकॉल यांचे उत्पान करण्यात बंदी असेल. नव्या नियमांनुसार येत्या 30 सप्टेंबर 2021 पासून प्लास्टिक पिशवीची जाडी 50 मायक्रॉनवरून 75 मायक्रॉन केली जाईल. तसेच पुढील वर्षी 31 डिसेंबर 2022 पासून हीच जाडी 120 मायक्रॉनपर्यंत वाढवली जाईल. सध्याच्या नियमानुसार देशात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या पिशव्यांचे उत्पादन, साठवण करण्यास बंदी आहे.
हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक : चक्क प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवले पेंटींग
हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक: कोलकात्यातील बांगुर एवेन्यू झालंय प्लास्टिक मुक्त