हैद्राबाद : महान क्रांतिकारक 'चंद्रशेखर आझाद' 27 फेब्रुवारी 1931 रोजी शहीद झाले, चंद्रशेखर आझाद यांचे जीवनच नव्हे, तर त्यांचा मृत्यूही प्रेरणादायी आहे, इंग्रजांच्या हाती न लागण्याची शपथ घेतल्याने आझाद यांनी स्वतःवर गोळी झाडली. जोपर्यंत आझाद मुक्त होता तोपर्यंत त्याला कोणीही कैद करू शकत नव्हते. चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना स्मरण करून आदरांजली वाहतो.
हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन : चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील भाबरा नावाच्या ठिकाणी झाला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य बलिदान दिले. चंद्रशेखर अगदी लहान वयातच देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा भाग बनले. 1922 मध्ये चौरी चौरा घटनेनंतर गांधींनी आंदोलन मागे घेतल्यावर आझाद यांचा काँग्रेसशी भ्रमनिरास झाला. यानंतर ते पंडित राम प्रसाद बिस्मिल आणि शचिंद्रनाथ सन्याल, योगेश चंद्र चटर्जी यांनी 1924 मध्ये स्थापन केलेल्या 'हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन' मध्ये सहभागी झाले.
काकोरी घटनेत प्रथमच घेतला भाग : या संघटनेत सामील झाल्यानंतर, चंद्रशेखर यांनी प्रथमच रामप्रसाद बिस्मिल यांच्या नेतृत्वाखाली काकोरी कांड (1925) मध्ये सक्रिय सहभाग घेतला. चंद्रशेखर यांनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला 1928 मध्ये लाहोरमध्ये ब्रिटीश पोलीस अधिकारी एसपी सॉंडर्स यांना गोळ्या घालून घेतला. या यशस्वी कार्यक्रमांनंतर त्यांनी इंग्रजांचा खजिना लुटला आणि संघटनेच्या क्रांतिकारी कार्यांसाठी निधी गोळा करण्यास सुरुवात केली. चंद्रशेखरचा असा विश्वास होता की, हा पैसा फक्त भारतीयांचा आहे, जो इंग्रजांनी लुटला होता.
मध्यवर्ती विधानसभेत बॉम्ब : चंद्रशेखर आझाद यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी ८ एप्रिल १९२९ रोजी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीवर बॉम्बस्फोट केला. हा स्फोट कोणाला इजा करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला नव्हता. ब्रिटिश सरकारने केलेल्या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ हा स्फोट करण्यात आला. या घटनेचा परिणाम म्हणून, क्रांतिकारक खूप लोकप्रिय झाले. सेंट्रल असेंब्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना अटक झाली.
म्हणूनच चंद्रशेखरला 'आझाद' म्हणतात : चंद्रशेखर यांना 'आझाद' हे नाव एका खास कारणासाठी मिळाले. चंद्रशेखर 15 वर्षांचे असताना त्यांना एका खटल्यात न्यायाधीशासमोर हजर करण्यात आले. तेथे न्यायाधीशांनी त्याचे नाव विचारले असता, 'माझे नाव आझाद आहे, माझ्या वडिलांचे नाव स्वातंत्र्य आहे आणि माझे घर जेल आहे', असे सांगितले. हे ऐकून न्यायाधीश संतापले आणि त्यांनी चंद्रशेखरला 15 फटके मारण्याची शिक्षा सुनावली, त्यामुळे त्याचे नाव प्रसिध्द झाले. चंद्रशेखरला आयुष्यभर स्वत:ला मुक्त ठेवायचे होते.